सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ जून २०२४
उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यांची स्वामी भक्ती कधी कधी इतकी उफाळून येते, की त्यांनी उधळलेली मुक्ताफळे, आणि त्यातून उद्भवणारी परिस्थिती सावरता सावरता उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांना नाकी नऊ येतात. यापूर्वी खा. संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे ते स्वतःही आणि शिवसेनेसह उद्धव ठाकरे ही अडचणीत आलेले आहेत.
आताही असाच प्रकार खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याने निर्माण झाला आहे. "आगामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच असतील!" असे सांगून आघाडीमध्ये बिघाडी करण्यासाठी काडी टाकली. उद्धव ठाकरे यांना बाजू सावरून घेत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा ठरलेला नाही, असा खुलासा करावा लागला.
उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचा मुख्यमंत्री पदासाठी कोणताही निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चेनुसार लोकसभेप्रमाणेच विधानसभेला 'बिनाचेहऱ्याने' सामोरे जायचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे राऊत यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज असा टोला लगावला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाही खा. संजय राऊत यांनी आपल्या बेताल वक्तव्याने महाआघाडीला अडचणीत आणले होते. सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा तर केवळ राऊत यांच्यामुळेच वाढल्याचे मानले जाते.
"आता यावरून तरी शहाणे होतील तर ते राऊत कसले ?" असा टोला महाआघाडीतील नेत्यांसह विरोधकांकडूनही लगावला जात आहे. आता यापुढील काळात राऊत यांनी आपली जीभ सैल सोडली नाही, तरच आघाडी एक संघपणे निवडणुकीला सामोरे जाऊ शकते, असे महाआघाडीतील एका नेत्याने वक्तव्य केले आहे.