yuva MAharashtra देशातील 'ही' राज्यं एनडीएच्या '400 पार'साठी फायद्याचे ?

देशातील 'ही' राज्यं एनडीएच्या '400 पार'साठी फायद्याचे ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जून २०२४
'अब कि बार 400 पार…' या घोषणेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. तेव्हापासून संपूर्ण निवडणूक प्रचारात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे एनडीए 400 जागा जिंकू शकेल की नाही.? 

निवडणुकीचा निकाल उद्या सगळ्यांसमोर येत आहे. याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. ABP CVoter च्या एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी पूर्वीपेक्षाही मोठा विजय मिळवू शकतात. यावेळी भाजप गेल्या वेळेपेक्षा 12 जास्त जागा जिंकू शकतो आणि एनडीएचा आकडा 353 वरून 368 पर्यंत वाढू शकतो” असे म्हटले गेले आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर दक्षिण आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये भाजपचा जनाधार वाढू शकतो. या जनाधार असलेल्या सीट्समध्येही रुपांतर करता येते. तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिशा आणि पश्चिम बंगाल अशी काही राज्ये आहेत

केरळ आणि आंध्र प्रदेशात भाजपचे खाते उघडणार 

केरळ हा नेहमीच कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीच्या भागीदारांनी 20 पैकी 19 जागा जिंकल्या. एक जागा माकपला गेली. NDA ला एकूण 15.64 टक्के मते मिळाली पण एकही जागा जिंकता आली नाही. यावेळी केरळमध्ये एनडीएचे खाते उघडले जाऊ शकते. ABP CVoter च्या एक्झिट पोलने केरळमध्ये NDA ला 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. मतांची टक्केवारी 22.6 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

त्याचबरोबर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंसोबत एकत्र आल्याने भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. जिथे 2019 च्या निवडणुकीत एनडीएला एकही जागा मिळाली नव्हती, तिथे आता सर्व 25 जागा एनडीएच्या खात्यात जाऊ शकतात. CVoter सर्वेक्षणात इंडिया आघाडीला एकही जागा मिळण्याची अपेक्षा नाही. मात्र, जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष YSRCP, जो एकटा लढत आहे, तो 0 ते 4 जागा जिंकू शकतो. असे झाले तरी एनडीएला किमान २१ जागा मिळू शकतात.

लोकसभेच्या २५ जागा असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये YSR काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. वायएसआरसीपी एनडीएशी स्पर्धा करत आहे. येथे एनडीएमध्ये भाजप, तेलुगु देसम पक्ष आणि जनसेना पक्षाचा समावेश आहे. तेलुगू देसम पक्षाने सर्वाधिक 17 जागा लढवल्या. भाजपने 6 जागांवर आपले उमेदवार उभे केलेत.

तामिळनाडूत मोदींची जादू चालली !

तामिळनाडू हे दक्षिण भारतातील लोकसभेच्या सर्वाधिक 39 जागा असलेले राज्य आहे. आतापर्यंत येथे भाजपचे हात रिकामे होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाईपासून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत त्यांनी तामिळनाडूवर विशेष लक्ष केंद्रित केले. पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा तामिळनाडूला भेट दिली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी ध्यानासाठी तामिळनाडूतील कन्यापुरी शहराचीही निवड केली. कन्याकुमारी येथील विवेकानंद मेमोरियल रॉक येथे पंतप्रधान मोदी ४५ तास ध्यानात मग्न होते. कदाचित त्याचाच परिणाम असा असावा की आता येथे भाजपचे खाते उघडले जाऊ शकते.

ABP CVoter च्या एक्झिट पोलनुसार, तामिळनाडूमध्ये NDA 0-2 जागा आणि इंडिया आघाडी 37-39 जागा जिंकू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपने देशभरात चमकदार कामगिरी केली होती परंतु तामिळनाडूमध्ये त्यांचे खाते देखील उघडले नाही. डीएमकेने राज्यातील 39 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ८ जागा, सीपीआयला २, सीपीआयएमला २, व्हीसीके आणि आययूएमएलला प्रत्येकी १ जागा मिळाली. याशिवाय एआयएडीएमकेनेही एक जागा जिंकली.

ओडिशा-तेलंगणात भाजपला दुप्पट जागा मिळतील 

ओडिशा आणि तेलंगणामध्ये भाजपच्या जागा दुप्पट होऊ शकतात. CVoter एक्झिट पोलनुसार, तेलंगणातील 17 जागांपैकी भाजपला 7-9 जागा मिळतील आणि काँग्रेसला अंदाजे तितक्याच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर गेल्या वेळी भाजपला येथे केवळ 4 जागा मिळाल्या होत्या. BRS आणि AIMIM यांना 0 ते 1 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. 2019 मध्ये तत्कालीन सत्ताधारी BRS ने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या होत्या. यानंतर भाजपला 4, काँग्रेसला 3 आणि एआयएमआयएमला 1 जागा मिळाली. ओडिशातही भाजपला प्रचंड जागा मिळताना दिसत आहेत. राज्यात लोकसभेच्या 21 जागा असून एनडीएला 17-19 जागा मिळताना दिसत आहेत. 2019 च्या निवडणुकीत राज्यातील 21 पैकी 12 जागा सत्ताधारी बीजेडीने जिंकल्या होत्या. भाजपला 8 तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.

बंगालमध्ये मोठी उलथापालथ

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. येथे भाजपला गेल्या वेळेपेक्षा ५०% जास्त जागा मिळू शकतात. भाजपला एकूण 42 पैकी 23 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या आणि टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या. यावेळी टीएमसीला केवळ 13 ते 17 जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बंगालमध्येही मतांमध्ये बदल होऊ शकतो. तृणमूल काँग्रेसचा भाजपला वाटा कमी होताना दिसत आहे. टीएमसीचा मताचा हिस्सा ४३.७% वरून ४१.५% पर्यंत कमी होऊ शकतो. तर भाजपच्या मतांची टक्केवारी 40.6% वरून 42.5% पर्यंत वाढू शकते.

ही राज्ये एनडीएसाठी 400 च्या पुढे दरवाजे उघडू शकताशकतात ?

दक्षिण आणि पूर्वेकडील या 6 राज्यांमध्ये (तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल) एकूण 164 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला गेल्या वेळी केवळ 30 जागा जिंकता आल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीनंतर, ABP CVoter एक्झिट पोलचा अंदाज आहे की NDA या राज्यांमध्ये एकूण 69 ते 85 जागा जिंकू शकेल जर हा अंदाज खरा ठरला आणि एनडीएने 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 353 जागा कायम ठेवल्या तर एनडीए 400 चा टप्पा पार करण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भाजपचा 90% पेक्षा जास्त जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. काही राज्यांमध्ये भाजपला सध्याच्या जागा गमवाव्या लागतील असेही दिसून येत आहे.