Sangli Samachar

The Janshakti News

इंडिया आघाडीचा सूज्ञपणा !


| सांगली समाचार वृत्त |
 नवी दिल्ली - दि. १३ जून २०२४
सत्ता मिळेलसुद्धा, पण विरोधी पक्ष म्हणून भाजप असेल तर ती राबवणे कठीण होईल हे समजण्याइतके शहाणपण अनुभवी काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. भविष्यात फोडाफोडी अथवा पाडापाडीचे राजकारण काँग्रेस खेळणार नाही असे मात्र मुळीच नाही. चंद्राबाबू, नितीश कुमार यांच्या मदतीने उभे राहिलेले कोणाचेही सरकार पडायला किंवा पाडायला कोणतेही निमित्त पुरते. मुळात इंडिया आघाडी ही संकल्पना नितीश कुमार यांची. तिथे ते डावलले गेल्याने त्यांनी भाजपचा किनारा गाठला. उद्या सुरक्षित संधी मिळाली की पुन्हा सूर मारून ते पलीकडच्या काठावर कधी जातील हे कळणारसुद्धा नाही. कर्ज फेडून पूर्ण मालकीच्या झालेल्या आलिशान घरातून चाळीतील भाड्याच्या घरात राहायला जावे आणि इथून स्टेशन जवळ पडते असे लटके समाधान करून घेण्याची वेळ सत्ताधार्‍यांवर आली हे मात्र खरे!

मुस्लीम समाजाने पूर्ण म्हणजे 90 टक्के क्षमतेने आणि हिंदूंनी जेमतेम 45 टक्के इतकेच मतदान केले, असा रडका सूर आता लावला जात आहे, तो दिशाभूल करणारा, कारण त्यांचे 90 आणि आपले 45 टक्के संख्येने जवळपास सारखेच. माझ्या घराशेजारी एक मतदान केंद्र होते. तिथे मुस्लीम मतदार अधिक असावेत. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथली रांग कमी होत नव्हती. रिक्षा, दुचाकी, चारचाकी, टेम्पो, ओला, उबर मिळेल ते वाहन भरभरून स्वयंस्फूर्तीने मतदार येत होते. त्यातील फार थोड्यांना तांत्रिक कारणाने मतदान करता आले नसेल, पण ते प्रमाण अत्यल्प होते. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी अहोरात्र कंठशोष केला कुणी? आजवरच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात असे घडले नव्हते. गोंधळी, सुमार दर्जाचे पथनाट्य कलाकार, शालेय विद्यार्थी, किन्नर यांना यासाठी कामाला लावले गेले, पैसे उधळले गेले, हे तर खरे ना…ते भूत अशा प्रकरे उलटले तर त्याचे खापर आता फोडून उपयोग काय? असा हट्ट किंवा दुराग्रह नोट के बदले व्होट याला अप्रत्यक्षपणे उत्तेजन देतो हे निवडणूक आयोगाला कुणी सांगितले नाही का?

मोदी सरकारने केलेली उदात्त, भव्य, अतिखर्चिक कामे मतदारांनी दुर्लक्षित केली. कारण त्याचा अतिरेकी प्रचार. आमच्यासारखे आम्हीच ही मानसिकता. नैतिकता, देशभक्ती, चोख व्यवहार, न्याय निष्ठुर इत्यादी म्हणजेच आम्ही, आणि त्या बाबतीत कुणी काहीही शंका घेऊ नये. मान्य, पण आपले वर्तन तसे नाही असे मतदारांना वाटले तर?


मोदी की गॅरंटी… हे स्वतः मोदीच छाती बडवून सांगत होते. कुठल्याही आर्थिक व्यवहारात, कर्ज प्रकरणात गॅरंटी देणारा स्वतः कर्जदार अथवा लाभार्थी नसतो इतकेही अर्थ भान भाजपच्या चाणक्य नेत्यांना नसावे? मोदी की गॅरंटी हे मोदी सोडून इतर नेत्यांनी म्हणायला हवे होते. मुस्लीमबहुल राज्यात आवास योजनेंतर्गत लाखो मुस्लिमांनी पक्की घरे मिळवली, पण त्यांनी भाजपला मते दिली नाहीत. मुळात फुकट दिलेल्या कुठल्याही वस्तूचे, सेवेचे मोल नसते. मुळात ती योजना पंतप्रधान आवास योजना म्हणून राबवली गेली. त्याचा मतदानात फायदा आपल्यालाच होईल हे गृहीत धरून कसे चालेल? मतदानाच्या सात फेर्‍या. प्रत्येक ठिकाणच्या उघड प्रचाराची वेळ संपली की उरलेल्या 48 तासात मोदींची वेगवेगळ्या वाहिन्यांवर दीर्घ मुलाखत. ते इतर वेळी पत्रकारांना सामोरे जात नाहीत.

मग हे कसे? कायद्याला बगल देऊन प्रचाराचा हा नवा प्रकार यावेळी अनुभवला. तरीही त्याचा उपयोग झाला नाही. शेवटच्या टप्प्यात त्यांनी एक मुलाखत दिली, म्हणजे घडवून आणली. त्यात त्यांनी एक बेजबाबदार तरीही धाडसी विधान केले. महात्मा गांधी यांची ओळख जगाला गांधी सिनेमामुळे झाली. हे उत्तर अथवा प्रतिक्रिया कुठल्या प्रश्नावर होती कुणास ठाऊक. मार्टिन ल्यूथर किंग अथवा नेल्सन मंडेला हे जगाला जसे ठाऊक होते तसे गांधी नव्हते. वास्तवात या दोन्ही नेत्यांचे प्रेरणास्थान हेच गांधी. हे त्यांनी शेकडो वेळा उत्स्फूर्तपणे, अभिमानाने, गौरवाने जगभर हजारो वेळा सांगितले असेल. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे वयोवृद्ध माजी पंतप्रधान. संयत आणि संयमी अर्थशास्त्री विद्वान हीच त्यांची पहिली ओळख. त्यांनी अलीकडेच मोदी यांच्याबद्दल अतिशय थोडक्यात सभ्य शब्दांत मत प्रदर्शन केले. ते विचारात घ्यावे असेच होते. ज्या राष्ट्रपती मुर्मू यांना संसद भवन आणि राम मंदिर लोकार्पण सोहळा यापासून अकारण खड्यासारखे लांब ठेवले त्यांचीच मदत आज सत्तास्थापनेसाठी घेण्याची वेळ भाजपवर यावी, याला काव्यगत न्याय म्हणावा लागेल.