सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ जून २०२४
(जिमाका) - राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थनि महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील महिला, बेरोजगार, युवकयुवती यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलीना व्यावसायिक शिक्षण मोफत, पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी १५ हजार कोटींचा प्रकल्प, शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी देणारी 'मुख्यमंत्री बळीराजा बीज सवलत योजना', सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण, एकूणच दुर्बल घटकाचे दारिद्रय नाहीसे करण्यासाठी केलेला निश्वय यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. विशेषतः महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण यामुळे राज्य शासनाने वारकरी संप्रदा प्रति महिलांबद्दल बांधिलकी व्यक्त केली आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायत कार्यालये बांधणे व इतरही प्रमुख पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असल्याने राज्याचा झपाट्याने विकास होईल, असेही ते म्हणाले.