| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३० जून २०२४
ओझे...
आपल्यातील प्रत्येक जण कसले ना कसले तरी ओझे, जीवनातील कांही ना कांही काळासाठी तरी वहात असतो. कुणावर लग्न जमत नसल्याचे ओझे, तर पती-पत्नीमध्ये झालेल्या बेबनावामुळे विभक्त होऊन एकटेपणाचे कुणाला ओझे. कुणी आर्थिक अडचणींच्या ओझ्याने बेजार झालेला असतो तर, संपत्तीसाठी नातेवाईकांनी केलेल्या कोर्टकचे-या, खटल्यांच्या ओझ्यापायी कुणाचा तरी जीव मेटाकुटीस आलेला असतो. कुणी वहात असतो म्हातारपणी मुलं विचारत नसल्याचे ओझे... तर, कुणी निःसंतान असल्याचे...
व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्यांची ओझी.
कांही ओझी काळानुरूप उतरवली जातात पण एक ओझे, आपल्या प्रिय व्यक्तीशी काळाने केलेल्या कायमच्या ताटातुटीचे... ते मात्र कधीही उतरत नाही... दिवस जातील तसे हे ओझे थोडे हलके होते. नाही असे नाही, पण जखमेवर खपली धरली तरी अश्वथाम्याच्या अखंड वाहणा-या जखमेप्रमाणे असणारे हे ओझे मनाच्या कुठल्यातरी कोप-यामध्ये सतत वास करून असते. एखादा प्रसंग, घटना अचानक घडते, निमित्त होते आणि जखमेवरील खपलीला धक्का लागून मनाचा बांध फुटतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासाची आठवण भळाभळा वाहू लागते. मन दुःखी होते, बेचैन होते, कांही सूचत नाही आणि मग कांही क्षणांसाठी कां होईना फरफटत्या पायांनी जीवनाची वाट तुडवावी लागते. अशा हळव्या क्षणी दुःखी, निराश मनाला मायेची, समजुतीची हळुवार फुंकर घालणा-या आधाराची गरज असते. कांही थोडे भाग्यशाली ज्यांना असा आधार मिळतो.
त्या दिवशी माझेही तसेच झाले. राहुनराहून मला पुर्वीचे दिवस आठवत होते. ते छोटेसे घर, तो राजाराणीचा सुखी संसार, ते आनंदी छोटे चौकोनी कुटुंब आणि अचानक आसमंतात कायमच्या विरून गेलेल्या चौकानाच्या दोन बाजू. मोडलेल्या जीवनाची दिशा बदलून त्याची दशा झाली.
त्या दिवशी कांहीतरी घडले आणि माझ्या जखमेवरील खपलीला तडा गेला. दुःखी मनाने मी घराच्या बाहेर पडलो. पाणी आटून गेलेल्या कोरड्या डोळ्यांनी चोहोकडे भिरभिर नजरेने, पाय नेतील तिकडे फरफटत चालू लागलो. थकलेल्या पायांनी मला एका बागेमध्ये थांबविले. बागेतील एका निर्जन कोप-यातील बाकांवर मी बसलो आणि ‘तो’ उद्भवला. ‘तो’... माझ्या मनातील कोपरा... मला, माझ्या भावना, दुःखांना समजाऊन घेणारा, हळूवारपणे मला समजाऊन सांगणारा, नेहमी माझी सोबत करत, साथ देत मित्र या संज्ञेला ख-या अर्थाने जगणारा.
माझ्या या अशा मित्राचे माझ्या दुख-या मनावर फुंकर घालणा-या आवाजातील शब्द मला ऐकू आले.
“राजा, आज फिरून एकवार प्रिय पत्नी, मुलाची आठवण उचंबळून वर आली आहे, होय नां?”
मी फक्त होकारार्थी मान हलवली.
माझ्या मनातील ‘तो’ कोपरा पुढे बोलू लागला,
“राजा, या जगातील अत्यंत कठोर, एकमेव सत्य म्हणजे मानवी जीवनाला असणारा अंत. श्रीराम, श्रीकृष्ण, जी'झस ख्राईस्ट, महंमद पैगंबर, भ. बुद्ध, भ. महावीर, संत-महात्मे, शूर योद्धे, जगज्जेते, महान व्यक्ति सर्वसर्वजण, तुला असलेल्या प्रिय व्यक्ति, तू स्वतः, मी कुणी-कुणीही याला अपवाद नाही, कुणाचीही यातून सुटका नाही. मृत्यूमुळे प्रिय व्यक्तींशी कायमची होणारी ताटातूट हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक. हे सर्व खरे असले तरी त्याची आठवण सतत उराशी बाळगत सतत दुःखी होऊन कांहीही साध्य होत नाही.
मनाला दुःखी करणा-या घटना या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. पण, आपण त्यावरच विचार केंद्रित केले तर हाती असलेल्या क्षणाकडेही दुर्लक्ष होते. उलट नैराश्य, नकारार्थी विचारांनी मन व्यापले जाते. दैनंदिन जीवन जगतांना मानवाचा यंत्रमानव बनून जातो. त्यामुळे मानवी जीवनांतील असे हे घटक ज्यांच्यावर आपले, मानवाचे नियंत्रण नसते. त्यांना स्विकारून, त्यांचे वर्चस्व मान्य करून, आपल्या नियंत्रणाखालील घटकांच्या सहाय्याने आत्मविश्वासाने आपल्या जीवनाचा मार्ग आपणच सुकर केला पाहिजे.
माझे हे बोलणे तुला कठोर वाटेल, पण सत्य आहे. आणि सत्य हे नेहमी कठोर असते. राजा, मी तुझा खरा मित्र. तुझ्या भावना, सुख, दुःख समजू शकतो. तुझ्या मनातील विचारांचा निचरा होण्यासाठी तुझ्यासारखेच दुःखाचे जड ओझे वाहत असलेल्या; एका तरुणाचे ओझे हलके कसे झाले त्याची कथा तुला सांगतो, लक्षपुर्वक ऐक.” माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने कथा सांगायला सुरूवात केली.
एका गावांमध्ये माधव नांवाचा एक तरूण राहत होता. एके दिवशी माधवच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. दुर्दैवाच्या या जबरदस्त फटका-याने माधवचे मन वावटळीमध्ये उडणा-या झाडांच्या पानांप्रमाणे सैराभैरा झाले. दिवस, महिने ओसरले पण माधवच्या मनातून आई-वडिलांची आठवण कमी होईना. माधवला जीवन निरस वाटू लागले. त्याची ही स्थिती पाहून त्याच्या एका हितचिंतकाने त्याला गावाबाहेरील डोंगरावर वास्तव करून असलेल्या महात्म्याचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला.
माधव त्या महात्म्याकडे गेला. नमस्कार करून, आपल्या येण्याचे कारण त्याला सांगितले आणि दुःखातून सुटकेचा मार्ग सांगण्याची विनंती केली.
त्या महात्म्याने आपले डोळे मिटले व कांही क्षण विचार करून आपल्या जवळच्या झोळीतून मुठीच्या आकाराचा एक दगड काढून माधवला दिला.
“उद्या सकाळी हा दगड व वाटेत तुझ्या मनाला प्रसन्न करणारे जे कांही आढळेल ते घेऊन ये. पण लक्षांत ठेव; येते वेळी हा दगड एका क्षणांसाठीही हातांतून बाजूला करायचा नाही, घट्ट धरायचा.”
महात्म्याने माधवला सांगितले. दगड घेऊन माधव घरी परतला. दुस-या दिवशी सकाळी माधव मुठीच्या आकाराचा तो दगड आपल्या हातात घट्ट धरून डोंगराच्या दिशने चालू लागला. कांही वेळ तसाच चालत राहिला. थोड्या वेळाने माधवला आपला बोटांमध्ये, हातांमध्ये ताण जाणवू लागला. जसजसा वेळ जाऊ लागला, तसतशा वेदनांची तीव्रता वाढू लागली. माधवला कांही सुचेना. दगड हातात घट्ट धरून चालणे त्याला कष्टाचे वाटू लागले. आणखी कांही वेळाने तर माधवला मुठीच्या आकाराच्या दगडाचे वजन पर्वतासारखे जड वाटू लागले. कधी एकदा हातातील हे ओझे फेकून देतो असे माधवला झाले. दमत, हापत, कसाबसा मोठ्या कष्टाने डोंगर चढून तो महात्म्याच्या झोपडीत शिरला व झोपडीत शिरताच त्यांने तो दगड खाली जमिनीवर फेकून दिला.
माधवची ती अवस्था पाहून तो महात्मा माधवला म्हणाला,
“मुला, दगडाचे ओझे वाहतांना तू खुप थकला आहेस. मनाला प्रसन्न करणारे कांहीही तुला वाटेत आढळले नसणार. पण कांही हरकत नाही. उद्या सकाळी तू परत ये. यावेळी येतांना दगड तुझ्या हातात धरू नकोस, पण तुझ्याजवळ ठेव. आणि हे बघ, तुझ्या मनाला प्रसन्न करणारे वाटेत जे कांही आढळेल ते आणायला मात्र विसरू नकोस हं.”
दुस-या दिवशी पहाटे माधव लवकर उठला. आन्हिके आवरून कपडे केले. दगड आपल्या शर्टच्या खिशामध्ये ठेवला. शर्टाच्या खिशातून दगडाचा स्पर्श माधवला जाणवला व माधवला आपल्या आई-बाबांच्या अंतिम क्रियाविधीवेळी पुरोहितांनी सांगितलेले शब्द आठवले. ‘तुम्ही तुमच्या आई-वडीलांना आता या मातीच्या, पिठाच्या-भाताच्या पिंड रुपात जाणायचे व त्यांची पूजा करायची'.
सहजच एक विचार माधवच्या मनात झळकलाः महात्म्याने दिलेला हा दगडही माझ्या आई-बाबांचे एक रूप असू शकेल. मनात उमटलेल्या या विचारासरशी दगडाचा स्पर्श माधवच्या हृदयाला परिस स्पर्श भासला. आपल्या आई-वडिलांची, त्यांनी भरभरून दिलेल्या प्रेमाची माधवला आठवण झाली. त्याचे डोळे भरून आले. माधवने आपल्या हातांने हृदयस्थानी असलेल्या त्या दगडाला प्रेमाने कुरवाळले व डोंगरावरील महात्म्याकडे जाण्यासाठी तो झपाट्याने घराच्या बाहेर पडला. रस्त्यावरून चालतांना माधवचा हात वारंवार दगडाजवळ जात होता, त्याला कुरवाळत होता. एका मोठ्या कालावधीनंतर प्रथमच माधव एक वेगळेच आत्मिक सुख अनुभवत होता. त्या आत्मिक सुखात माधव डोंगराच्या पायथ्याशी पोहचला.
डोंगराआडून सूर्यनारायण हळूहळू वर येत होता. मित्राच्या स्वागतासाठी उत्सुक आकाशाने विविध रंगांची आकर्षक रांगोळी पूर्व दिशेला घातली होती. पाखरे कर्णमधुर चिवचिवाट करत होती. मंद हवेची झुळुक मनाला सुखावत होती. निसर्गाचे हे रम्य रूप पाहून माधवचे भान हरपले.
भारावलेल्या स्थितीत तो हवेत तरंगल्याप्रमाणे डोंगर चढू लागला. डोंगराच्या वाटेवर रंगीबेरंगी रानफुलांचे ताटवे फुलले होते. फुलांनी हातात हात घालून पसरवलेल्या सुवासाने माधवचे मन प्रसन्न झाले. माधवने कांही रानफुले तोडली व डोंगर चढून त्यांने महात्म्याच्या झोपडीत प्रवेश केला. आपल्या जवळील फुलांची ओंजळ माधवने त्या महात्म्यांच्या पायावर सोडली व नमस्कार करून तो त्यांच्या बाजूला हात जोडून उभा राहिला.
तो महात्मा अत्यंत प्रेमळ स्वरात म्हटले...
“मुला, तू आज आनंदी आहेस हे पाहून मला खूप बरं वाटल. काल तू खूप थकला होतास. डोंगराची वाटचाल तुला कष्टप्रद झाली होती. कारण, काल तू त्या दगडाला; तुझ्या दु:खाला, घट्ट धरून होतास. पण आज तोच दगड तुझ्या जवळ असूनही, त्याचा मूळ भार-वजन तेवढेच असूनही डोंगराची चढण चढतांना तुला त्याचे ओझे जाणवले नाही. कष्ट जाणवले नाहीत. कारण आज तू दुःखाला घट्ट पकडले नव्हतेस. तर, त्याला आपल्या हृदयाजवळचे स्थान दिले होतस. त्याला आपलेसे केले होतेस.
"मुला, जो पर्यंत आपण आपल्या प्रिय व्यक्तिंना विसरत नाही तो पर्यंत त्या मृत होत नसतात, हे नेहमी ध्यानात ठेव. प्रियजनांच्या कायमच्या ताटातुटीचे कधीही न संपणा-या दुःखाला, आपण जर घट्ट कवटाळून जीवनाची मार्गक्रमणा करु लागलो तर, जीवनाची वाटचाल क्लेशदायक बनते. पण त्याच दुःखाला जर आपण आपले मानले, आपला सोबती बनवले तर, जीवनाची वाटचाल करतांना त्रास तर होत नाहीच, पण ईश्वरनिर्मित या जगातील लहान-लहान, आपल्याजवळ असूनही आपल्याला कधीही न जाणवलेल्या सुंदर गोष्टींचा आनंद वेचता येतो.
मुला, जीवनाची वाटचाल करताना हे सत्य जाण आणि आपल्या जीवनाची वाटचाल कर. तो दिनदयाळू तूझे कल्याण करो. शुभं भवतु!”
आशीर्वाद देत महात्म्याने माधवला सांगितले. माधवला महात्म्याने केलेला उपदेश पटला. या पुढे आपले जीवन दुःखाच्या ओझ्याला ओझे न समजता आपला सोबती समजून जगायचे हे मनोमन ठरवून महात्म्याला प्रणाम करून माधव घरी परतला.” माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने आपली कथा संपवली.
दुःखाच्या वेदनांनी, नैराश्याने खाली झुकलेली माझी मान वरती झाली आणि मी माझ्या सभोवताली पाहिले. बागेतील हिरवळीवर छोटी-छोटी मूले आनंदाने हसत खेळत, नाचत होती. मुलांचे आई-वडिल कौतुकभरल्या डोळ्यांनी मुलांचा खेळ पाहत जवळच बसले होते. बागेतील रंगीबेरंगी सुंदर फुले हसुन एकमेकांना खुणावत होती. झाडावरील चिमण्या, पोपट, मैना, कोकीळा, इतर पक्षी आपल्या भाषेत साद घालत होते. मनाला प्रसन्न करणारे ते सर्व दृश्य पाहून, जीवनांतील माझ्या प्रिय व्यक्तिंच्या सोबत घालवलेल्या सुखाच्या क्षणांची व मनातील कोप-याने सांगितलेल्या गोष्टीतील महात्म्याचे शब्द मला आठवले आणि माझ्या मनातील ‘तो’ कोपरा मला म्हणाला,
“राजा, तुझ्या प्रिय व्यक्ती शरीराने तुझ्यापासून जरी दूर गेल्या असल्या तरी त्यांचा स्मृतीगंध जो तुझ्याजवळ नेहमीच आहे. त्याला आपल्या हृदयाशी जपून ठेव आणि तुझ्या जीवनाची वाटचाल कर.”
हळव्या बनलेल्या माझ्या मनावर समजुतीच्या शब्दांची हळूवार फुंकर घालून माझ्या मनाचा ‘तो’ कोपरा परतला आणि स्मृतीगंधाला हृदयाशी जपत मी घरी परतलो.
- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भ - जॉर्ज इलीयट - मेरी ॲनी (मरियन) इव्हान्