सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २६ जून २०२४
केंद्रातील गतवेळच्या मोदी सरकारने केलेल्या तसेच महाराष्ट्रातील युती सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी मतदान करून आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महाआघाडीतील घटक पक्षांचा टक्का वाढला तसेच मनोबलही. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पदरात अधिकाधिक जागा मिळवण्याची शर्यत महाआघाडीत दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा शिवसेना काँग्रेसचे कोंडी करण्याची शक्यता लक्षात घेऊन, 'मेरिटवरच जागावाटप' या मुद्द्यावर जागावाटप करताना महाविकास आघाडीमध्ये शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षांचा दबाव न जुमानता लोकसभा निवडणुकीतील यशाच्या आधारेच वाटाघाटी करण्याची रणनिती आज काँग्रेसच्या बैठकीत आखण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने काँग्रेसवर केवळ एक खासदार असल्याचे कारण देत जागावाटपामध्ये दबाव वाढविला होता. शिवाय, महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र येऊन काँग्रेसची कोंडी करत असल्याचेही काही नेत्यांकडून सांगण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटप करताना पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊनच वाटाघाटी कराव्यात, असाही आग्रह धरण्यात आल्याचे समजते.
काँग्रेस मुख्यालयामध्ये आज पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी तसेच संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत राज्य विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती बैठक झाली. या बैठकीत प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह राज्यातील ३० हून अधिक नेत्यांचाही सहभाग होता.