yuva MAharashtra मुंबईतील काँग्रेसच्या कार्यक्रमातील खा. विशाल पाटील यांच्या संस्काराचीच सर्वत्र चर्चा !

मुंबईतील काँग्रेसच्या कार्यक्रमातील खा. विशाल पाटील यांच्या संस्काराचीच सर्वत्र चर्चा !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ जून २०२४
सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार केला. तेव्हा पटोलेंनी विशाल यांच्या खांद्यावर हात टाकत 'कानमंत्र' देखील दिला. यावेळी आमदार विश्‍वजित कदम यांच्या कामाचा गौरवदेखील करण्यात आला.

या गौरव कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांनी यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला व सर्वांचे आशीर्वाद घेतले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विशाल पाटील यांनी जिल्हा पिंजून काढत असताना वारंवार 'संस्कारा'विषयी उल्लेख केला होता. मुंबईतील गौरव कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांचे हे संस्कार अधोरेखित झाले. आणि याच संस्काराची चर्चा, तेथील कार्यक्रमासह सध्या मतदार संघात होत आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसने तेरा लोकसभा मतदार संघात विजय मिळवला आहे. त्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा आणि बैठक आज मुंबईत पार पडली. नाना पटोले यांच्यासह काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख, आमदार सतेज पाटील, विश्‍वजित कदम आदी उपस्थित होते.

कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विशाल यांचा सत्कार करण्यात आला. विशाल यांनी कोंडीतून मार्ग काढत साकारलेल्या विजयाचे यावेळी विशेष कौतुक झाले. निवेदक नेत्याने ' सांगलीत, उद्धव ठाकरे यांच्यासमोर आम्ही सांगलीचे टायगर आहोत, असे सांगणारे आणि ते सिद्ध करून दाखवणारे नेते,' असा विश्‍वजित कदम यांचा परिचय करून दिला आणि विशाल यांच्यासह त्यांचाही गौरव करण्यात आला. नाना पटोले यांच्या हस्ते विशाल यांचा सत्कार झाल्यानंतर विशाल यांनी पटोलेंसह सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. पटोलेंना विशाल यांचा हात खेचत त्यांना थांबवले आणि कानात काहीतरी सांगितले. हा कानमंत्र काय होता, याची चर्चा चांगलीच रंगली आहे.