| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जून २०२४
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता प्रत्येक पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या दररोज बैठका घेतल्या जात आहेत.
तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विधानसभेची जोरात तयारी सुरु आहे. शिंदे गटाचीदेखील नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडलीय. भाजपला यश मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट सत्तेतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेची अशीच लगबग आता मनसे पक्षातदेखील सुरु आहे. मनसेमध्ये तर लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून हालचाली सुरु होत्या. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. ठाकरेंनी महायुतीसोबत जागावाटपावर चर्चा केली नाही. पण आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांना भाजपकडून भक्कम आश्वासन मिळाल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे या निवडणुकीत महायुतीसोबत राहिले तर त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गेम होऊ शकतो. अर्थात महायुतीत सहभागी व्हायचं की नाही, ते मनसे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते परस्परांशी चर्चा करुन ठरवतीलच. पण राज ठाकरे यांच्या पक्षाकडून काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जवळपास निश्चित करण्यात आले असून तिथे पक्षाकडून जोरदार कामालादेखील सुरुवात करण्ययात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मनसेकडून विधानसभेसाठी काही उमेदवार निश्चित?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून काही विधानसभामधील उमेदवारांची जवळपास निश्चिती करण्यात आली आहे. वरळीमधून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत. तर माहीममधून मनसेचे नेते नितीन सरदेसाई निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मनसेचे सध्याचे एकमेव आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढणार आहेत. विशेष म्हणजे मनसे नेत्यांकडून या मतदारसंघांमध्ये कामालाही सुरुवात झाली आहे. मनसे स्वबळावर लढणार की महायुतीसोबत? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र काही विधानसभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी आपल्या एका भाषणात यापुढे आपण सत्तेतच राहू, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच दूरगामी परिणाम पडतात का? ते आगामी काळात आता स्पष्ट होणार आहे.