Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग; फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन बाहेर पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यातल्या चर्चेनंतर नागपूरहून मुंबईत आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या होणार्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत.


फडणवीसांच्या राजीनाम्याचा फैसला उद्या

दरम्यान लोकसभा निवडणुकीतल्या खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपल्याला मंत्रिमंडळातून मोकळं करा आणि संघटनेचं काम करू द्या, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या विनंतीबाबत मंगळवारी निर्णय व्हायची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत उद्या महाराष्ट्र भाजप कोअर कमिटी दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहे. अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी बीएल संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत चर्चा होणार आहे. सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय संघटनेचं बळकटीकरण होणार नाही, यावर अजूनही देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.