आपल्या लहानपणी वर्तमानपत्र वाचणे आणि टीव्हीवर बातम्या पाहणे, रेडिओवर बातम्या ऐकणे हा कित्येक जणांचा नित्यक्रम असलेला आफण अगदी जवळून पाहत आलेलो आहोत. वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ हे जग व जगाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीचे तेव्हाची प्रभावी माध्यमं. वर्तमानपत्रातील एकूण एक बातमी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत वाचण्याची अगदी प्रत्येक वर्तमानपत्र वाचनप्रेमी जणांसाठी अत्यंत आवडीचे काम. वर्तमानपत्र त्यातील अग्रलेख वाचणाची सवय व आवड हे प्रत्येक नियमित वर्तमानपत्र वाचकाला जडतेच.
बातम्यामुळे माणूस जगाशी आणि जग माणसाशी जोडले जाते हे स्पष्ट आहे. पूर्वी दळवळणाच्या सुविधा अपुर्या असलेल्या काळात, जगात काय घडत आहे हे जाणून घेण्याकरीता ही माध्यमंच काय ते एकमेव आधार असायची. वर्तमानपत्रातील बातम्या वाचताना घडलेली घटना जशीच्या तशी डोळ्यासमोर उभं करण्याचे सामर्थ्य त्या वार्तांकनात असते. एकदा एखादी बातमी वाचली की, मग याच बातमीच्या आधारे झालेल्या ज्ञानवृद्धीतून कित्येक वाचक यथाशक्ती आपली माहिती समाजातील इतरांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करताना पहायला मिळतात.
वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी म्हटल्यानंतर ती सर्वसामान्यांच्या कायम विश्वासास पात्र राहत आलेली आहे हे पूर्वीपासून आपण पाहत आलो आहे. सामाजिक राजकीय सांस्कृतिक अर्थिक शैक्षणिक जवळपास सर्वच क्षेत्राशी सबंधित बातम्या लेख आदींनी ओतप्रोत भरलेल्या अशा वर्तमानपत्रांकडे ज्ञानवृद्धीसाठी असणार्या अनेक स्त्रोतांपैकी एक महत्वाचे व अग्रगण्य स्त्रोत म्हणून पाहिले जाते.
लोकांना जागं करणे, अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे, तळागळातील सर्वसामान्य दुर्लक्षितांचा आवाज होणे, समाजप्रबोधन करणे, समाजाला योग्य दिशा देणे व भ्रष्टाचारी व्यवस्थेचे वेळोवेळी वाभाडे काढत त्याच्याविरूद्ध आवाज उठवत राहणे ही महान कार्य या माध्यमाद्वारे पार पडत असतात. केवळ याचमुळे अन्यायग्रस्तांना यांचा अधार वाटत असते तर भ्रष्टाचार्यांच्या मनात यांच्याबद्दल भय निर्माण झालेले असते. म्हणून ही माध्यमं जेवढी सजग सावध व प्रामाणिक तेवढी समाज व्यवस्था ही अधिकाधिक निर्धोक व निर्भय राहत असते हे लक्षात घेतले पाहिजे.
काळ बदलला तसं या क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन माध्यमं जन्माला आली. वर्तमानपत्र टीव्ही रेडीओनंतर आता समाजमाध्यमाचा उदय झालेला आपण पाहत आहोत. एखाद्या घटनेचे वार्तांकन म्हणा किंवा प्रक्षेपण म्हणा या सोशल मीडियामुळे अगदी काही क्षणात हातोहात व्हायरल होऊन प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्टफोनमध्ये येऊन धडकत असतो. अशा व्हायरल व्हिडीओवर मनोमन विचारशून्य प्रेम करणारा फार मोठा वर्ग अलीकडे जन्माला आला आहे आणि या वर्गाची संख्या वाढण्याचे प्रमाण हे भयंकर आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
हे व्हायरल व्हिडीओ प्रेमी कसलाही विचार न करता, आपल्याला कुणीतरी पाठवलेला व्हिडीओ पोस्ट ही खरी की खोटी याबद्दल अगदी पुसटसाही विचार करण्याची तमा न बाळगता आपल्या संपर्क यादीतील सर्वांना हा व्हिडीओरूपी पोस्टरूपी ठेवा वाटत सुटतात. याचा पुढील माणसाच्या विचारसरणीवर व अंतिमतः एकंदरीत समाजावर काय परिणाम होईल किंवा होऊ शकतो याचा विचार करण्यासाठी आपला जन्म नव्हेच! यावर त्यांचे ठाम एकमत असते.
असे भयंकर फॉरवर्डी व त्यांच्यामुळे विचारशून्य वाचक आणि प्रेक्षक जन्माला येऊ लागले तर मोबाईलमध्ये विश्वासार्ह म्हणून काही शिल्लक आपण ठेऊ की नाही हा सुज्ञांना भेडसावणारा आजमितीचा सर्वात मोठा प्रश्न ठरावा एवढे मोठे गांभीर्य यात दडलेले आहे. ज्या बाबी आपल्यासाठी नवीन असतात त्या बाबी ह्या उत्सुकतेच्या विषय असतात. त्या नवीन असतानाच त्या उपयोगी किती आणि उपद्रवी किती याची शहनिशा करणे गरजेचे असते.
ही शहनिशा झाली नाही आणि अशा नवनिर्मित बाबींच्या बाबतीत काही चुकीचे पायंडे पडले की त्याकाळातील बेजबाबदार आणि बेसावधपणाचे वागणे पुढील परिणामांसाठी कारण ठरत असते हा साधा आणि सरळ नियम याठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. 'रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणारे हात ते, रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीचे आपल्या मोबाईलमध्ये तात्काळ चित्रीकरण करण्यासाठी धडपडणारे हात' असा हा परस्पप्रवासी प्रवास येऊन थांबलेला आहे.
हे चित्र बदलण्याची मनोमन इच्छा बाळगणार्यांनी अगोदर अफवांचे पेव फुटेल असे प्रक्षोभक वादग्रस्त असणारे व्हायरल व्हिडीओ व्हायरल पोस्ट डोळे बंद ठेवून वार्याच्या वेगाने फॉरवर्ड करत सुटलेल्यांना विचारप्रवण करण्याची आणि हा समाज विघातक उपक्रम वेळीच थांबवण्याची गरज आहे हा मूळ विषय लक्षात घेतला पाहिजे.
वायफळ व कसलाही विचार न करता तारतम्य न बाळगता बोलणे या बाबत 'उचलली जीभ लावली टाळ्याला' अशी म्हण प्रसिद्ध आहे. हेच बोभाटपणे कसलाही विचार न करता संवेदनशील पोस्ट फॉरवर्ड करत सुटलेल्या अशा विचारशून्य माणसांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर 'उचलले बोट अन केले फॉरवर्ड' असे म्हणता येईल. बोलण्याच्या बाबतीत जसं वायफळ गप्पा मारणार्यांना समाज किंमत देत नाही तसंच अशाप्रकारे फॉरवर्ड करत सुटलेलेही किंमतीस पात्र ठरत नाहीत हे खरे.
मात्र ही मंडळी वाद वाढवणे व परिस्थिती बिघडवण्यासह अफवा पसरवण्यात मात्र यशस्वी होताना दिसतात. बरं यात अशांचे फावते ते या गोष्टी आभासी असल्यामुळे. त्याचे कारण असे की यांच्या अशा चुकीच्या फॉरवर्डपणामुळे यांना प्रत्यक्षरूपाने समोरासमोर उत्तर भेटत नाही. कुणी बोललेच तर तेही आभासी अर्थात ऑनलाईन प्रतिक्रीयेच्या रूपाने बोलतील त्याचा ही स्वंयघोषीत हुशार मंडळी किती विचार करत असतील हे सुज्ञांस सांगणे न लगे. सकाळी सकाळी समाजमाध्यमं जरा उघडायची म्हंटलं तरी धडाधड मेसेज येऊन पडलेले पहायला मिळतात. यातील अर्ध्याहून अधिक मेसेज हे पाठवणार्यांच्या दृष्टीने ज्ञान देणारे असतात, मात्र त्यामुळे कुणाच्या ज्ञानात भर पडताना दिसत नाही.
असे मेसेज वाचायला व ऐकायला जरी सुंदर असले तरी ते ज्याने पाठवलेले असते त्यालाच त्यातील ज्ञानाची खरी नितांत गरज आहे असे पहिल्यांदा तो मेसेज वाचणार्याला वाटत असते. उदाहरणच घ्यायचे असेल तर सकाळी लवकर उठण्याचे महत्व सांगणारा मेसेज फॉरवर्ड करणारा आपण सकाळी उशिरा उठून फॉरवर्ड करत आहोत याचाही विचार करत नाही, आपल्याच मित्रांना सुसाटपणे गंडवणारा हा प्रामाणिकपणाचे मेसेज फॉरवर्ड करताना आपले कुकर्म लक्षातही ठेवत नाही असे कितीतरी उदाहरणे आपल्याला सापडतील.
एखाद्या सिद्धहस्त लेखक कवी वक्ता समाजसुधारक विचारवंत यांच्या विचारांना या समाजाने स्वीकारलं ते विचार जीवनात उतरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले ते त्या सिद्धहस्त लेखक कवी विचारवंत समाजसुधारकांच्या 'आधी केले मग सांगितले' या मूळ तत्वामुळे. ते जगाला सांगितले एक व स्वतः वागले एक असे झाले नाही. म्हणूनच लोक त्यांचा आदर्श स्वीकारला. स्वयंदृष्टीने ज्ञानवृद्धीचे मेसेज फॉरवर्ड करणार्यांनी या मुळ तत्वाचे चिंतन करण्याची गरज आहे.
मात्र असे सुसाटपणे केवळ लोकांना स्वयंदृष्टीने ज्ञान वाटण्याच्या पोस्ट फॉरवर्ड करून आपली प्रतिष्ठा वाढेल व समाज सुधारेल असे जर कुणी समजत असेल तर तो फार मोठा गैरसमज आहे, उलट असे मेसेज फॉरवर्ड करून ते अन्यांच्या मनस्तापाचे धनी होताना दिसतात, हे लक्षात घ्यायला हवे. एखादी बाब इतरांना सांगण्यास पात्र होण्यासाठी अगोदर ती बाब स्वतःमध्ये अंगीकारणे आवश्यक असते हा साधा नियम लक्षात घेऊन वागण्याची गरज आहे.
प्रक्षोभक, वादग्रस्त, परिस्थिती अशांत करणारे व अफवा पसरवणार्या मेसेजपासून सुज्ञांनी स्वतःस व समाजास दूर ठेवण्याची गरज आहे. समाजमाध्यमावर अलीकडे येत असलेल्या बातम्या पाहता यामुळे बातम्याचा लोकजागृती हा मूळ उद्देेशच कुठंतरी बाजुला होत चालल्याचे पहायला मिळते. राजकीय नेत्याचे मत किंवा प्रतिक्रीया जाणून घेताना त्यांचे आपल्या जनतेच्या भविष्यासाठीचे विकासासाठीचे विचार जाणून घेण्याऐवजी त्यांना त्यांच्यावर कुण्या एका नेत्याने केलेल्या टीकेच्या प्रतिक्रियेची अपेक्षा केली जात आहे.
यश-अपयश, सुख-दुःख व आयुष्यातील चढ-उतार आपल्याला अधिक सजग अधिक कणखर व अधिक परिपूर्ण बनवायला आलेले असतात हे एकदा नीट समजून घेतले की माणूस हसत हसत हार पराभव व दुःख स्वीकारतो व या परिस्थितीत शांत राहून उपाययोजना करत तो त्यातून बाहेर पडतो. यासाठी जीवनात स्थैर्याला निवांतपणाला व स्वंयचिकित्सेला फार महत्व आहे. आपण जे पाहतो जे वाचतो जे ऐकतो त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.
विशेषत: आजची मुले व तरूण पिढी जी आपला अधिकतर अमूल्य वेळ या सभाजमाध्यमावर व्यतीत करताना दिसतात ते त्यात स्वतःचं आयुष्य स्वहस्ते वाहवत नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका मर्यादेत राहून निवडक गोष्टी स्वीकारून नको त्याकडे दुर्लक्ष करून आणि ज्याच्या सत्य असत्याची पुष्टी आपण करू शकत नाही असे मेसेज व्हिडीओ केवळ व्हायरल आहेत.
म्हणून इतरांना पाठवण्यापासून स्वतःला दूर ठेवत या समाजमाध्यमाचा सुयोग्य वापर आपण करू शकलो तरच ते फायदेशीर आहे हे नित्य लक्षात ठेवले पाहिजे. आभासी जगातला अनाठायी व अनावश्यक वावर कमी करून मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर आकाशी झेप घेण्याचे स्वप्न बाळगून ते सत्यात उतरवण्यासाठीची पावले निरंतर उचलली गेली पाहिजेत. स्वतःसह अन्यांसाठी स्वयंकृतीद्वारे आदर्श प्रस्थापित केला तर आणि तरच स्वतःसह सर्वांच्या जीवनात खरा आनंदाचा प्रकाश अवतरीत होईल हे खरे आहे.