Sangli Samachar

The Janshakti News

दुचाकी चोर जोमात पोलीस कोमात; विश्रामबाग पोलीस ठाण्याजवळून दुचाकी गायब !


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जून २०२४
सांगली शहरातील दुचाकींची वाढती चोरी पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून दुचाकीची चोरी ठरलेली आहे. पोलीस सतर्क नाहीत असे नाही. मध्यंतरी काही दुचाकी चोरट्यांच्या मुस्क्या आवळल्याही. परंतु तरीही दुचाकी चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.

आता तर हे धाडस तितके वाढले आहे की, प्रत्यक्ष पोलीस ठाण्यासमोरूनच चोरट्यानी एक दुचाकी पळवली. सीसीटीव्ही तपासण्यात आला. पण चोरट्या इतका हुशार की, त्याने सीसीटीव्हीलाही गुंगारा दिला.


वारणाली येथील नजीर अब्दुल जितेकर हे आपल्या कार्यालयीन कामासाठी विजयनगर येथे जाणार होते. विश्रामबाग येथे पोहोचल्यानंतर, त्यांनी विचार केला न्यायालयाच्या परिसरात आपली दुचाकी सुरक्षित राहील की नाही कुणास ठाऊक. समोर विश्रामबाग पोलीस स्टेशन होते. शेजारीच जिल्हा पोलीस मुख्यालय. आता चोरटा आपले दुचाकी येथून कशाला चोरून नेईल, असा विचार करून त्यांनी आपली दुचाकी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातील पार्किंगमध्ये लावली. गाडी लॉकही केली.

इतकी सारी काळजी घेऊनही चोरट्याने अगदी ठरवून केल्याप्रमाणे याच दुचाकीची चोरी केली. जितेकर यांनी पहिल्यांदा आसपास आपली दुचाकी शोधली. ती सापडत नाही म्हटल्यानंतर थेट विश्रामबाग पोलीस ठाणे घातले आणि आपली कैफियत मांडली. पोलीसही या प्रकाराने चक्रावले. त्यांनीही आजूबाजूला शोध घेतला पण परिणाम शून्य. आता विश्रामबाग पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. परंतु नागरिकांना प्रश्न पडला आहे की, "पोलिसांच्या नाका खालून जर वाहन चोरी होत असेल तर आपण व आपले घर किती सुरक्षित आहोत ?"