yuva MAharashtra राज्यात 'नोटा' ला सुमारे सव्वा चार लाख मतं !

राज्यात 'नोटा' ला सुमारे सव्वा चार लाख मतं !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ जून २०२४
देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी 'नोटा' ला पसंती दिली आहे. नुकताच निकाल जाहीर झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 4 लाख 15 हजार 580 मतदारांनी 'नोटा'ला पसंती दर्शवली. रायगडात सर्वाधिक म्हणजे 27 हजार 270 जणांनी नोटाचं बटण दाबलं तर बीडमध्ये सर्वांत कमी म्हणजे 2087 जणांनी 'नोटा'ला मतदान केलं.

लोकसभा 2024 च्या निडणुकीत रायगडमधून पुन्हा एकदा खासदार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा फटका बसला होता. त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याकडून अवघ्या 2 हजार 110 मतांनी पराभव झाला होता. त्या निवडणुकीत 'नोटा'ला 20 हजार 362 मतं मिळाली होती. या निवडणुकीत देखील रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 'नोटा'चा वापर झाला असला तरी यावेळी तटकरेंनी अनंत गीते यांचा 82 हजार 784 इतक्या मताधिक्यानं पराभव केला.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभेसाठी संधी दिली होती. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीमध्ये 'नोटा'ला सर्वाधिक कमी म्हणजे 2 हजार 87 इतकी मतं पडली. यावेळी बीडमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये बीडमध्ये अडीच हजार जणांनी नोटाचं बटण दाबलं होतं.


महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय 'नोटा'ला पडलेली मतं (उतरता क्रम)

1. रायगड - 27270
2. पालघर - 23385
3. ठाणे - 17901
4. मावळ - 16760
5. गडचिरोली - चिमुर - 16577
6. मुंबई उत्तर पश्चिम - 15161
7. नंदुरबार - 14123
8. जळगाव - 13919
9. मुंबई दक्षिण मध्य - 13423
10. दक्षिण मुंबई - 13411
11. मुंबई उत्तर - 13346
12. कल्याण - 11686
13. रत्नागिरी - सिंधुदुर्ग - 11643
14. चंद्रपूर - 10843
15. भंडारा - गोंदिया - 10268
16. मुंबई उत्तर पूर्व - 10173
17. मुंबई उत्तर मध्य - 9749
18. शिरूर - 9661
19. यवतमाळ - वाशिम - 9391
20. भिवंडी - 9347
21. बारामती - 9151
22. दिंडोरी - 8246
23. रामटेक - 7827
24. पुणे - 7460
25. सांगली - 6565
26. नाशिक - 6185
27. कोल्हापूर - 5983
28. अकोला - 5783
29. छ. संभाजीनगर - 5773
30. सातारा - 5522
31. नागपूर - 5474
32. शिर्डी - 5380
33. हातकणंगले - 5103
34. धुळे - 4693
35. वर्धा - 4634
36. धाराशिव - 4298
37. रावेर - 4100
38. बुलडाणा - 3786
39. माढा - 3702
40. नांदेड - 3628
41. लातूर - 3567
42. जालना - 3537
43. परभणी - 3385
44. नगर - 3282
45. हिंगोली - 3123
46. अमरावती - 2544
47. सोलापूर - 2725
48. बीड - 2087

एकूणच काय तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त तर बीडमध्ये सर्वांत कमी नोटाचा वापर झाला. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 4 लाख 15 हजार 580 मतदारांनी 'नोटा'ला पसंती दर्शवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 4 लाख 88 हजार 766 जणांनी 'नोटा'चं बटण दाबलं होतं. त्यामुळं मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 'नोटा'चा वापर कमी झाला. थोडक्यात, 'नोटा'ला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 73 हजार 186 मतं कमी पडली, असंच म्हणावं लागेल.