yuva MAharashtra इमोशनल होऊन नाही, स्ट्रक्चरल काम करण्यासाठी निर्णय घेतोय - देवेंद्र फडणवीस

इमोशनल होऊन नाही, स्ट्रक्चरल काम करण्यासाठी निर्णय घेतोय - देवेंद्र फडणवीस



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ७ जून २०२४
लोकसभा निकालांमध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. राज्यातील लोकसभा निकालांमध्ये महायुतीला मिळालेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्विकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राज्य सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अशातच आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीत फडणवीसांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या भेटीदरम्यान, राज्यातील पराभवाच्या कारणांवर झाली सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी रचनात्मक काम करण्याची इच्छा अमित शाह यांना बोलून दाखवली. पण, राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.


भेटी दरम्यान काय झालं ?

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची आज दिल्लीत भेट झाली. सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. मात्र, फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे. राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली आहे. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मानस असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावर दिल्लीतल्या बैठकीत चर्चा झाली. दिल्लीला जाण्याआधी फडणवीसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली.