भाजपला मतदारांनी त्याची जागा दाखवली आहे. तर विरोधी पक्षांसाठी हा विजय नसून त्यांचे राजकारण अधिक टोकदार करत नेण्याची संधी आहे. माध्यमांना हाताशी धरून नाटय़मय घटना घडतील अशी व्यवस्था केली जाते, तेव्हा पराभव निश्चित असतो. पक्ष आणि नेते अजिंक्य आहेत असे मानले जात असताना सत्ताप्राप्तीमध्ये अडथळे येतात, तेव्हा त्या अडथळय़ांसह सत्ता टिकवणे कठीण होऊन बसते. हे सगळे म्हणजेच सध्याची भाजपची स्थिती होय. सलग दोन वेळा अखंड बहुमत मिळवून सत्ता उपभोगल्यानंतर भाजपला आता तिसऱ्यांदा सरकार बनवताना आघाडीतील घटक पक्षांच्या कुबडय़ा घेऊन पुनरागमन करावे लागत आहे. या परिस्थितीतून तीन गुंतागुंतीचे परिणाम होऊ शकतात.
सगळय़ात पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेतील भाजपचे संख्याबळ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमी होईल. दुसरी गोष्ट, याउलट, त्यांचा मतांचा वाटा पुन्हा मजबूत होईल. भाजपला जवळपास ३८ टक्के मते मिळाल्याने जे झाले आहे त्याला पराभव मानणे शहामृगासारखे ठरेल. तिसरी गोष्ट ही की सरकार स्थापन करण्यासाठी आणि पाच वर्षे सत्तेत राहण्यासाठी भाजपला पक्षांतर्गत तसेच आघाडीअंतर्गत अनेक तडजोडी कराव्या लागतील. भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने आजवर त्या कधी केलेल्या नाहीत. थोडक्यात अशा तडजोडींसाठी हे नेतृत्व कितपत तयार आहे, हा प्रश्न आहे. या सगळय़ा परिस्थितीमुळे आपल्या राजकीय परिप्रेक्ष्यातील कारस्थानीपणात, दडपशाही आणि सूडभावनेत वाढ होऊ शकते. भाजपसारख्या प्रबळ पक्षाला जमिनीवर आणणाऱ्या या निकालांनी देशातील मोडकळीस आणल्या गेलेल्या लोकशाही संस्था आणि संकुचित राजकारण्यांसमोर आव्हान उभे केले असावे, अशीही शक्यता आहे.
नरेंद्र मोदी हे २०१४ पासून भाजपच्या यशाचे मुख्य सूत्रधार आहेत. तात्पर्य, अपयशाची जबाबदारीदेखील त्यांचीच असू शकते. भाजपने एक अवाढव्य निवडणूक यंत्रणा उभी केली असली तरी ती यंत्रणा चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा मोदींकडून मिळते. दक्षिण भारतात तसेच पूर्वेकडील राज्यांमध्ये झालेल्या भाजपच्या विस्ताराचे (जागांच्या बाबतीत नाही, पण मतांच्या प्रमाणात) श्रेय मोदींना दिले जात असेल तर इतरत्र झालेल्या पडझडीलादेखील त्यांच्या नेतृत्वाची मर्यादाच कारणीभूत असू शकते. 'ब्रँड मोदी' नीट उलगडला जाणे आवश्यक आहे. मोदी या ब्रँडचा अर्थ, मोदी या व्यक्तीच्या पलीकडे नेमके काय आहे हे समजून घेण्यातून आपल्याला तीन गोष्टी उलगडण्यास मदत होऊ शकते. त्या तीन गोष्टी म्हणजे यावेळी जवळपास पराभवापर्यंत पोहोचलेल्या भाजपने आतापर्यंत काय साध्य केले आहे, ते कसे साध्य केले आहे आणि उद्याच्या भारतासाठी या सगळय़ाचा अर्थ काय आहे..
भाजपने राजकीय चर्चेच्या परिघामध्ये मूलभूत बदल केला आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दूरची स्वप्ने दाखवून सध्याच्या काळातील आर्थिक अडचणींवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे, धार्मिक-सांस्कृतिक कथनामुळे (नॅरेटिव्ह) भारावून जाऊन लोक आर्थिक समस्यांसह इतरही अनेक उणिवांकडे दुर्लक्ष करतील याची व्यवस्था करणे हे भाजपने केले आहे. २०१४ च्या भाजपच्या विजयामध्येही हे घटक अंतर्भूत होतेच, पण त्यानंतरच्या विजयांमध्ये ते अधिक अधोरेखित झाले. हिंदुत्व हा भारतातील सांस्कृतिक तसेच राजकीय व्यासपीठावरचा मुख्य मुद्दा बनावा हे राष्ट्रीय स्व. संघ (आपल्या या मातृसंस्थेची आपल्याला आता गरज नाही, असे भाजपने नुकतेच जाहीर केले आहे.) तसेच भाजपचे जवळजवळ शतकभरापासूनचे उद्दिष्ट होते. वर उल्लेख केलेल्या घटकांनीच भाजप आणि संघाला या महत्त्वाच्या टप्प्यावर आणले आहे.
भाजपने राजकारणात नेमके काय केले यासंदर्भातील हा महत्त्वाचा पैलू एकदा समजला की, १९९० पासूनच्या मोठय़ा आणि ऐतिहासिक बदलांच्या संदर्भात सध्याच्या निवडणुकीच्या निकालाचे स्पष्टीकरण करता येईल. भाजपच्या मागील कोणत्याही निवडणुकीतील प्रचारमोहिमेपेक्षा या निवडणुकीत 'डॉग हसल' म्हणजेच विशिष्ट गटाकडून बिनविरोध समर्थन मिळवण्यासाठी सूचक भाषेचा वापर आणि आक्रमक धार्मिक अस्मितेला थेट आवाहन केले गेलेले दिसले. विरोधकांनी लोकांचे लक्ष सामाजिक न्याय आणि वाटप या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्याचा मर्यादित परिणाम झाल्याचे दिसते. अल्पसंख्याकांबद्दलची भीती निर्माण करत भाजपने विरोधी पक्षांच्या प्रचाराला प्रत्युत्तर दिले. इथेच ब्रँड मोदी या घटकाच्या प्रासंगिकतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या सगळय़ाचे मिळून एक पॅकेज आहे: तारणहार म्हणून आहे त्यापेक्षा मोठे भासेल असे एखादे व्यक्तिमत्त्व उपलब्ध असण्याची सामाजिक गरज, जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक मजबूत नेतृत्व, हिंदुत्वाची शतकानुशतके जुनी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक धर्माभिमानी हिंदू व्यक्तिमत्त्व. 'इतरां'विरुद्ध मतदारांना चिथावणारा एखादा नेता आणि त्याचबरोबर आर्थिक महासत्ता बनण्याच्या अमूर्त कल्पनेवर घडवून आणलेली चर्चा.
मोदी राजवटीने हिंदुत्वाच्या संदर्भातले दोन घटक तसेच व्यक्तिमाहात्म्य या दोन गोष्टींना केंद्रस्थानी आणले. या सरकारच्या सर्व राजकीय हालचाली आणि धोरणात्मक उपक्रम या दोन घटकांमध्ये अंतर्भूत होते. या निवडणुकीने भाजपला जमिनीवर आणले आहे. पण त्यामुळे मोदींचे व्यक्तिमाहात्म्य कमी होण्याची तसेच ते आणि भाजप दोघेही हिंदुत्वाचा मुद्दा सोडण्याची शक्यता नाही. यामधून तणावनिर्मिती होऊ शकते. यापुढच्या काळात आपल्या दैवी भूमिकेची खात्री असलेल्या मोदींसारख्या नेत्याचे आघाडीचे आणि तडजोडीचे राजकारण आपण पाहणार आहोत. हिंदुत्व या संकल्पनेला कंटाळलेल्यांचे आणि या संकल्पनेच्या लोकप्रियतेचे राजकारण यापुढच्या काळात आपण एकत्रच पाहणार आहोत. या सगळय़ा भाजपच्या तिसऱ्या संभाव्य सत्ताकाळातील शक्यता आहेत. वेगवेगळय़ा लोकशाही संस्था खिळखिळय़ा करणे आणि राज्यघटना मोडीत काढणे हे 'प्रकल्प' राबवणे भाजपसाठी कठीण ठरेल, पण ते राबवण्याचा मोह भाजपला होणारच नाही, असे नाही.
त्याच वेळी, विरोधी पक्षांनी हा निकाल नीट समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक प्रश्नांवर लोकांच्या झालेल्या निराशेने भाजपला एक पाऊल मागे जरूर आणले असेल, पण याचा अर्थ मतदारांनी भाजपला नाकारले आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. या निकालाने त्यांच्यासमोर एक कठीण आव्हान उभे केले आहे. भाजपचा वर्चस्ववाद कदाचित मागे ढकलला गेला असेल, पण विरोधी पक्षांकडे त्याचा प्रतिकार करण्याची वैचारिक क्षमता नसेल तर तो वर्चस्ववाद पूर्ववत होऊ शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपचे संख्याबळ कमी झाल्याने त्याला एकाकी पाडण्याच्या राजकारणाला वेग येऊ शकतो. पण, बिगर-भाजप पक्षांमध्ये जिथे जिथे भाजप मजबूत आहे, तिथे तिथे त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद आणि इच्छाशक्ती आहे का, हा गंभीर प्रश्न आहे. मोदी राजवटीच्या दहा वर्षांनी हे दाखवून दिले आहे की सरकार अर्थव्यवस्था कसे हाताळते, रोजगाराचा प्रश्न कसा सोडवते, मतभेदांचे काय करते याची पर्वा न करता, समाजातील एक मोठा समूह सरकारच्या मूलभूत अजेंडय़ाच्या पाठीशी उभा आहे. तो अजेंडा फक्त व्यक्तिमाहात्म्य वाढवणे किंवा औपचारिक लोकशाही नियम पायदळी तुडवणे हा नाही. तर भारतीय मानसिकता बदलून भयावह धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. या निवडणुकीत मिळालेला धक्का भाजपला त्याच्या या अजेंडय़ापासून रोखू शकणार नाही, पण तसाच तो या अजेंडय़ापासून दूर असलेल्या मोठय़ा समूहांना जिंकू शकणार नाही. या पराभवानंतर भाजप दुसऱ्या दिवसापासून आपले मूळ राजकारण पुन्हा सुरू करेल. पण भाजपच्या जागा कमी होणे, हा आपला विजय नाही तर आपले राजकारण अधिक टोकदार करत नेण्याची संधी आहे, हे भाजपेतर पक्षांना समजेल का?