Sangli Samachar

The Janshakti News

सकल मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार राष्ट्रवादीची गोची !


सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ जून २०२४
सध्या मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून मोठे घमासान सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे 'सगेसोयरे' आणि 'ओबीसी कोट्यातूनच आरक्षण' या मुद्यावर ठाम आहेत. तर ओबीसी संघटनांनी जरांगे यांच्या मागणीला कडाडून विरोध केला आहे. महायुती शासनाची यामुळे चांगलीच गोची झाले असून, लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजही पेटून उठला असल्यामुळे यातून दोन्ही बाजूंना सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी महायुती सरकारची धडपड सुरू आहे.

परंतु आता सकल मराठा समाजाने घेतलेल्या एका भूमिकेमुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची मोठी गोची झाली आहे. आणि याचे कारण ठरले आहेत ते छगन भुजबळ ! छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांच्यावर कमालीच्या टोकाचे आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी सरकारलाही गर्भित इशारा दिला आहे. त्याच्या या भूमिकेमुळेच सकल मराठा समाज इरेस पेटला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, भुजबळ तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा विडा सकल मराठा समाजाने उचलला असून या संदर्भात विशेष रणनीती आखण्याचे तसेच सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. असे सांगून जगताप म्हणाले की, मराठा समाजास संवैधानिक मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य सरकारातील अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ गरळ ओकू लागले. ते येथेच थांबले नाहीत तर जरांगेचे चारित्र्यहनन करून त्यांच्यावर खालच्या पातळीवर टिकाटिप्पणीही सुरु केली. संवैधानिक पदावर बसलेल्या मंत्र्याच्या तोंडी अशी भाषा म्हणजे एक प्रकारे तो संविधानाचा अपमानच म्हणावा लागेल. मराठा समाजास डिचवण्यासाठी ओबीसी समाजास भडकवून भुजबळ यांनी प्रति आंदोलन व मोर्चे उभे करून त्याला आर्थिक रसदही पुरवली. आता तर ओबीसी कार्यकर्त्यांना उपोषणास बसवून मोठी नाट्यमय घडामोडी घडवून आणत स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर देत राष्ट्रवादी अजित पवार गटाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सकल सकल मराठा समाज चिडीस पडला असून, अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव करण्याचा विडा उचलण्यात आला आहे.

मराठा समाजाच्या या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून, तो कसा मिटवायचा हा प्रश्न आता महायुती समोर, विशेषतः अजित पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे.