सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जून २०२४
सर्वच घटकांना अच्छे दिन म्हणजे यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प होय, हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. महायुतीने सर्वच घटकांना भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी आहे. आर्थिक स्वावलंबना बरोबरच नारीशक्तीच्या वैविध्यपूर्ण गुणांना वाव मिळण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी राज्य शासनाने 2000 कोटी इतक्या भरभक्कम रकमेची तरतूद केली आहे त्यामुळे आता शिक्षण पूर्णपणे निशुल्क असेल.
पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देऊन महिलांच्या घर खर्चाला शासनाने हातभार लावलेला आहे तसेच शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करून व सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपयांची मदत देऊन त्याचप्रमाणे गाय दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान व 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा असे निर्णय घेणारा हा अभूतपूर्व अर्थसंकल्प म्हणावा लागेल.
प्रतिदिंडी 20000 रुपये निधी देऊन शासनाने भक्ती शक्तीचा गौरव केला आहे सर्वसामान्यसह शेतकरी, महिला, कष्टकरी, कामगार तसेच युवकांना न्याय देणारा हा नावीन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे. जिल्ह्यातील जतमध्ये या जर म्हैशाळ योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे हा मोठा प्रकल्पही लवकरच पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया आमदार सुधीर दादा घाडगे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना दिली.