Sangli Samachar

The Janshakti News

दिल्लीत फडणवीस यांच्याबाबत बाबत ठरलं; महाराष्ट्रात "नो चेंज" !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १९ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाल्यानंतर आज दिल्लीत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेनुसार उपमुख्यमंत्री पदापासून मुक्तता आणि भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाची जबाबदारी यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात होते. या बैठकीनंतर महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नसल्याचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले.


पत्रकारांनी फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा गोयल यांनी हे उत्तर दिले. यावेळी फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्र कोअर टीमची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक झाली. महाराष्ट्रात दिसलेल्या निकालांवर चर्चा केली. महायुती आणि मविआमधील मतांमध्ये फक्त ०.३ टक्क्यांचाच फरक आहे. आम्हाला कुठे मते कमी पडली, कुठे कुठले मुद्दे चर्चेत होते आदी विषयांवर चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या आमच्या रणनीतीवर चर्चा केली. यानुसार आम्ही एनडीएतील घटक पक्षांसोबत विधानसभेच्या चर्चा करू आणि भाजपा पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल.

या खुलाशानंतर राज्यात भाजपात नेतृत्वबदल होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस देखील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली जाणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.