yuva MAharashtra ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर ? मंत्री पुत्राचा गुंडासोबतचा व्हिडीओ व्हायरल ?

ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर ? मंत्री पुत्राचा गुंडासोबतचा व्हिडीओ व्हायरल ?



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १५ जून २०२४
राज्याचे कामगार तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खूनातल्या संशयित आरोपींची मंत्री सुरेश खाडे यांच्या सुशांत खाडे या मुलाकडून भेट घेत विचारपूस करण्यात आल्याचा कथित भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर संशयित आरोपी हे मिरज खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आले त्याने कामगार मंत्री पुत्र सुशांत खाडे याची थेट त्यांच्याच संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतल्याचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

विरोधकांकडून टीकास्त्र

पुण्यापाठोपाठ मिरज शहरात कोयता गँगची मोठी दहशत निर्माण झाली आहे. दोन वेळा कोयता गँगकडून मिरज शहरामध्ये सुमारे 35 ते 40 दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांच्याच कार्यालयामध्ये जर गुन्हेगारांच्या भेटीचा प्रकार घडत असेल, तर तो निषेधार्ह असून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

दरम्यान मंत्री सुरेश खाडे यांच्या चिरंजीवांसोबत गुन्हेगारांच्या भेटीच्या कथित व्हिडिओवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील जोरदार टीका केली आहे. मिरज तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सध्या गुंडाराज सुरू आहे. लोकसभेमध्ये सुरेश खाडे यांच्या मतदारसंघात अपक्ष खासदार विशाल पाटील यांना अधिकचे मतदान मिळाले आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये दहशतीच्या जोरावर मत मिळवण्यासाठी गुन्हेगारांना सोबत घेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मिरज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा अध्यक्ष विज्ञान माने यांनी केला आहे.


काँग्रेसकडूनही मंत्री खाडे यांच्या मुलाच्या सोबतच्या कथित व्हिडिओवरून टीका करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये विशेषत: मिरज शहरामध्ये ज्या घटना घडत आहेत, त्या घडत असतानाच हा व्हिडिओ समोर आला आहे. ते पाहता गुन्हेगारांना पाठबळ देण्याचे काम केलं जातंय का असा सवाल काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाष खोत यांच्या कडून उपस्थित करण्यात आला आहे.

अनावधानाने झालेली भेट, भाजपाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न

दरम्यान या व्हायरल व्हिडिओ बाबत मिरज भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आला आहे. मिरज मतदार संघाचे आमदार असणारे सुरेश खाडे हे राज्याचे कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री असल्याने सुरेश खाडेंच्या कार्यालयामध्ये अनेक जण भेटण्यासाठी येत असतात. खाडे साहेब उपस्थित नसल्याने सुशांत खाडे हजर होते. आणि सुशांत खाडे हे राजकारणामध्ये नवीन असल्याने त्यांना जे लोक आले होते ते ओळखीचे नसल्याने अनवधानाने ती भेट झाली, त्यामुळे विरोधकांना तो मुद्दा मिळाला आहे, असे स्पष्टीकरण देत भाजपाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.

मात्र मिरज तालुक्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे का नाही ? असा प्रश्न निर्माण या कथित व्हिडीओमुळे झाला असून या घटनेची उलट-सुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे महिला आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आता राज्य सरकार सांगली जिल्ह्यातील आणि विशेषतः मिरजेतील कायदा आणि सुव्यवस्था बाबत काय भूमिका घेणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.