सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जून २०२४
सांगलीत विशाल पाटील यांचा लिफाफा दिल्लीत पोहोचला. सांगलीमधील मतदारांनी विशाल पाटील यांना भरघोस निवडून दिलं. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपच्या संजय पाटील यांचा पराभव केला. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता निवडणूक जिंकल्यानंतर विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा दर्शवली आहे. तसेच पुढील राजकीय दिशा देखील स्पष्ट केली.
सांगली लोकसभा मतदारसंघात जिंकल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. तसेच विशाल पाटील यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेतली. यानंतर विशाल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विशाल पाटील म्हणाले, 'अपक्ष उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान मिळणं हे क्वचितच पाहायला मिळतं. सांगलीतील विजयाचं श्रेय हे काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना जातं. खरंतर जनतेने भारतीय जनता पक्षाचा पराभव केला आहे. जनतेने आणि आम्ही ठरवलं होतं की, भाजपचा पराभव करायचा आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती ही वेगळी असते. सांगली जिल्ह्यातील परिस्थितीविषयी आम्ही सातत्याने मांडत होतो
'सांगली जिल्ह्यातील मतदारांच्या मनातील गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. यंदा जनतेने ही निवडणूक हातात घेतली. सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीचा हेतू हा भाजपचा पराभव करणे होता. तो स्पष्ट झालेला आहे, असे ते म्हणाले.
'बाळासाहेब ठाकरे आणि वसंतदादा पाटील घराण्याचे चांगले सबंध होते. वसंतदादा पाटील यांचा नातू निवडून आलाय, म्हटल्यावर मला वाटतं नाही ते मनात राग धरतील. या निवडणुकीतून कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. उद्धव ठाकरे आमच्या वडिलांसमान आहेत. ते आम्हाला समजून घेतील. आम्ही काँग्रेसी विचारांचे आहोत. काँग्रेससोबत राहणार आहोत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.