| सांगली समाचार वृत्त |
छत्रपती संभाजी नगर - दि. २७ जून २०२४
कन्नड (जि. छत्रपती संभाजी नगर ) येथे होणाऱ्या राज्य कुमार कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी सांगलीचे दोन संघ रवाना झाले होते. छत्रपती संभाजी नगर मध्ये पोहोचलेल्या या परस्परविरोधी गटात 'आमचाच संघ राज्य स्पर्धेत खेळवावा' या मुद्द्यावरून वादावादी झाली. अखेर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे यांचा संघ अधिकृत आहे, असे जाहीर करून, शिंदेच्या संघास खेळण्यास परवानगी दिली. त्यामुळे संघ निवडीनंतर आरोप प्रत्यारोपाचा हुतुतूचा सामना रंगला. सध्या जिल्ह्यात याची चर्चा रंगली आहे.
सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर संघटनेत दोन गट पडून सातत्याने धुसफूस सुरू असते. राज्य कुमार, कुमारी स्पर्धेसाठीही सांगलीत दोन गटांनी दोन विविध निवड चाचण्या घेतल्या. नितीन शिंदे यांच्या गटाने कामेरी (ता. वाळवा) येथे, तर महेश पाटील यांच्या गटाने सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळात निवड चाचणी घेऊन जिल्ह्याचा मुले व मुली संघ निवडला होता. संघ निवडीवेळीच राज्य स्पर्धेत कोणाचा संघ खेळणार? याची चर्चा जिल्हाभर सुरु होती.
शिंदे व पाटील या दोन्ही गटांचे संघ ११ नोव्हेंबरला सकाळी कन्नड ( संभाजीनगर ) येथे पोहोचले. दोन्ही संघाचे म्हणणे महाराष्ट्र संघटनेने ऐकून घेतले. यावेळी नितीन शिंदे, गणेश शेट्टी, अशोक शेट्टी, विनायक विभूते, महेश पाटील, अतुल माने, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष माजी आ. किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर व कार्यवाह ॲड. पाटील यांच्यासमोर दोन्ही गटांनी आपले म्हणणे मांडले, बैठकस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तणावपूर्ण वातावरणात बैठक पार पडली.
'नितीन शिंदे हे कार्यवाह असलेल्या सांगली जिल्हा संघटनेस आम्ही संलग्नता दिली आहे. राज्य स्पर्धेचे प्रवेश पत्रही शिंदे यांनाच पाठवले आहे. त्यामुळे या स्पर्धेत शिंदे यांनी निवडलेला संघच खेळेल.' असा निर्णय महाराष्ट्र कबड्डी संघटनेने जाहीर केला. दरम्यान, खेळाडूंची वजने घेण्याच्या वेळी सांगलीचे दोन्ही संघ व महाराष्ट्र संघटनेचे पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान वादावादी झाली. पोलिसांच्या सावधगिरीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.