सांगली समाचार वृत्त |
छ. संभाजीनगर - दि. २९ जून २०२४
वाढते जागतिक तापमान आणि त्याला कारणीभूत असलेले घटक हा सध्या ऐरणीवरचा विषय ठरत आहे. परंतु अनेकदा उपाय शोधण्याऐवजी समस्यांचा पाढा वाचला जातो आणि यातून अंग काढून घेतले जाते. याला केवळ प्रशासनच जबाबदार आहे असं नव्हे, तर आपण जनता ही तितकेच जबाबदार आहोत.
स्व. इंदिरा गांधींच्या काळात "झाडे लावा झाडे जगवा" हा मंत्र दिला होता. परंतु 'झाडे लावून ती जगवण्याऐवजी, यातील मलिदा लाटून सत्ताकारणातील घटक जगला हे वास्तव आहे. खड्डे खाण्याचे एखादे रूप लावायचे, त्याचे फोटो सेशन करायचे. आणि तेच रोप अन्य खड्ड्यात लावून त्याची पुनरावृत्ती करायची. यामुळे माळरानावर झाडा ऐवजी सर्वत्र खड्डेच दिसून येत असल्याचा प्रकार मध्यंतरी वर्तमानपत्रातून फोटोसहीत प्रसिद्ध झाला होता.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील पानवडोद ग्राम पंचायतीचा आदर्श घेण्यासारखा आहे. या ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये 20 जून 2024 रोजी एक ठराव मंजूर करून घेतला. आपल्या पंचक्रोशीत दरवर्षी तापमानात वाढ होते आहे व पर्जन्यमान असंतुलित होते आहे याला कारण वृक्षतोड... त्यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबाने दोन झाडे लावायचे आणि त्याचे संगोपन करायचे बंधनकारक केले. असे न झाल्यास ग्रामपंचायत अंतर्गत त्यांना आवश्यक असणारी कोणतेही कागदपत्र दिले जाणार नाही असे ठणकावून सांगितले. पण केवळ आदेश देऊन ग्रामपंचायत थांबले नाहीत तर प्रत्येक शेतकऱ्याला ग्रामपंचायतीमार्फत दोन झाडे पुरविण्यात आले.
आता आवश्यक असणारी कागदपत्रच मिळत नाहीत म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व शेतात तसेच घरासमोर झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. गावातील इतर नागरिकांनीही यामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन गाव "हरित ग्राम" करण्याचा विडा उचलला आहे.
आपल्या सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग हा कायम दुष्काळी. येथील पाण्याची वाढवा. आणि मैलोनमैल असणारा उजाड माळ. याचा विचार करता. या भागातील ग्रामपंचायतीने हा आदर्श घेण्यास हरकत नाही. गरज आहे ती, प्रामाणिकपणाची आणि उत्कटतेने सहभाग घेण्याची.