yuva MAharashtra तुतारी वाजो, मशाल पेटो; डंका तर भाजपाचाच !

तुतारी वाजो, मशाल पेटो; डंका तर भाजपाचाच !



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १ जून २०२४
महायुतीपेक्षा महाविकास आघाडी चार जूनला भाव खाऊन जाणार… तुतारी आणि मशाल जोरदार मुसंडी मारणार… महायुतीकडे आमदारांची संख्या जास्त असली तरी हवा महाविकास आघाडीची होणार… महाराष्ट्रातील लोकसभा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून वारं आघाडीच्या बाजूने आहे, असा एकंदरीत ट्रेंड दिसत होता. म्हणूनच आम्ही 35 जागा जिंकू, असा दावा आघाडीकडून करण्यात आला… तर महायुतीच्या 40 च्या आसपास जागा निवडून येतील, असं सत्ताधारी गटाकडून सांगण्यात येतय… पण येत्या ४ जूनला मशाल आणि तुतारीला जनतेने कौल दिला तरी महाराष्ट्रात कमळच जिंकणार आहे… महायुतीच्या कमी जागा येण्यामध्ये भाजपचा कसा फायदा आहे ? शिंदे आणि अजितदादांच्या छातीत धडकी भरवणारा नेमका कोणता डाव भाजपने टाकलाय ? याचंच सविस्तर विश्लेषण पाहूया,

2019 ची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित लढली होती. यात शिवसेनेने लढवलेल्या 23 जागांपैकी अमरावती, शिरूर, रायगड, संभाजीनगर आणि सातारा या पाच जागा सोडल्या तर 18 जागांवर विजय झाला होता. तर भाजपने जबराट कामगिरी करत 25 जागांपैकी केवळ बारामती आणि चंद्रपूर सोडता 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे युतीला 2019 मध्ये महाराष्ट्रातून तब्बल 41 खासदारांचं संख्याबळ मिळालं होतं. आता यातील शिवसेनेच्या शिंदे गटासोबत 13 तर अजितदादांना 4 पैकी एका खासदाराने सपोर्ट केल्याने महायुतीच्या खासदारांची संख्या 40 पर्यंत म्हणजे जवळपास जैसे थेच राहिली…

हा झाला गेला बाजार इतिहास… हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं तेव्हा भाजपाला 28, शिवसेना शिंदे गटाला 15, राष्ट्रवादीला चार तर रासपला 1 अशा जागा सुटल्या होत्या. आता निकालानंतर भाजपची पोझिशन पाहिली तर दिंडोरी, भिवंडी, नंदुरबार, माढा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पालघर, सातारा या सात ते आठ जागांवर घासून लढत झाली. इथे भाजपा बॅक फुटला असल्याने समजा या सातही जागा आपण मायनस केल्या तरी भाजपला 21 खासदार आरामात निवडून आणता येतायेत, असा याचा अर्थ होतो. म्हणजे 2019 च्या तुलनेत खासदारांचा आकडा केवळ दोन ने घटतोय. पण शिंदे गटाच्या दोन ते तीन जागा आणि अजितदादांची एक जागा सोडली तर बाकीच्या सगळ्या जागा या काठावरच्या आहेत. या जागांवर तुतारी किंवा मशालीला पाठिंबा असल्याचं बोललं जात असल्यामुळे महायुतीच्या जागा घटत असल्या तरी त्याचा फटका शिंदे गट आणि अजितदादांना बसतोय, हे चित्र क्लिअर आहे. महाविकास आघाडीच्या या वाढणाऱ्या खासदारांच्या संख्येचा इम्पॅक्ट दिल्लीतील भाजप सरकारवर होणार नाही, असही बोलायला हरकत नाही. याउलट जर अशी परिस्थिती राहिली तर याचा भाजपलाच भविष्यात फायदा होणार आहे.

यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विधानसभेतील बार्गेनिंग पॉवर. विधानसभेला कुठल्या पक्षाला किती जागा सुटणार याची परीक्षा 4 जूनला पार पडणार आहे. भाजपने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली आणि अजित पवार आणि शिंदे गटाला समाधानकारक खासदारांचा आकडा गाठता आला नाही. तर यामुळे भाजपची महाराष्ट्र विधानसभेतील जागा वाटपात बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. अजित पवार गटाने आत्तापासूनच 90 जागांची मागणी करून वादाला तोंड फोडलेलं पाहून लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीत मोठी घासाघीस होणार हे तर आता जवळपास कन्फर्म आहे. त्यामुळे भाजपचा वाढलेला खासदारांचा आकडा तर दुसरीकडे शिंदे आणि अजितदादांचा एकेरी आकडा ही गोष्ट कळत नकळतपणे भाजपच्याच पथ्यावर पडणारी आहे. बंडाळीचा आणि गद्दारीचा टॅग, काठावरच का होईना पण भाजपला दिल्लीतील दिसत असणारं बहुमत आणि स्वतंत्रपणे लढण्यासाठी नसणारी परिपक्व यंत्रणा यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपवर अवलंबून राहावं लागणार आहे. याचाच विचार केला तर लोकसभेला झालेलं जागावाटप इथेच भाजपने विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केला होता, असं म्हणायला हरकत नाही.

महायुतीचा कमी आकडा म्हणजे भाजपची ताकद असं म्हणायला दुसरं कारण ठरतं ते म्हणजे पक्षाची पुन्हा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फोडाफोडीच्या राजकारणात सर्वात जास्त फटका हा भाजपालाच बसला. महाविकास आघाडी कायम असताना एकटी भाजप विरोधात होती. तेव्हा विरोधक म्हणून आक्रमक होत फडणवीसांनी ट्रिपल इंजिन सरकारला चांगलाच घाम फोडला होता. राज्यातील कडवट विरोधक म्हणून भाजपने आपला स्पेस तयार केला होता. पण पुढे सत्तेच्या महत्त्वकांक्क्षेपोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून भाजप सत्तेत आली खरी. पण जनतेच्या मनात भाजपबद्दल एक निगेटिव्ह परसेप्शन्स बिल्डप व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे चार जूनला महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यातही भाजपची कामगिरी समाधानकारक तर शिंदे आणि अजितदादांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. तर हे कारण पुढे करत भाजप विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढू शकते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रिशंकू परिस्थितीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संधी ही भाजपालाच मिळू शकते…या सगळ्याचा विचार करता लोकसभेला मशाल पेटन असो, की तुतारी वाजणं यात फायदा हा भाजपचाच आहे,असं चित्रं सध्यातरी पाहायला मिळत आहे.