| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १ जून २०२४
पंढरपुरात आलेल्या भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीला दान केलेले २८ किलो सोन्याचे आणि ९५० किलो चांदीचे दागिने वितळवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. दागिने वितळवण्यासाठी विधी व न्याय खात्याकडे मंदिर समितीने प्रस्ताव दिला असून त्यांचा निर्णय आल्यानंतर दागिने वितळण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे मंदिरातील ९ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहेत.
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे ८०० ते ९०० किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भगृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे. हे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण केले जाणार आहे. विठ्ठलाचे २ जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु होणार आहे.
अनेक वर्षापासून मंदिर समितीकडे लहान मोठे (Gold) सोने चांदीचे दागिने पडून आहेत. यामुळे दागिने वितळण्याची परवानगी मंदिर समितीने मागितली आहे. विधी व न्याय विभागाची परवानगी मिळाल्यानंतर मंदिर समितीकडून २९ किलो सोन्याचेआणि ९५० किलो चांदीचे दागिने वितळवणार आहेत. हे दागिने वितळवून सोन्याची विट तयार केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.