Sangli Samachar

The Janshakti News

"या गं या विधवा सयांनो, पारंपारिक वडपूजनाला विज्ञानाची जोड देऊया !" - सांगलीत अभिनव उपक्रम


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
पती निधनानंतर आठवणींच्या वेदनासह आयुष्य जगणाऱ्या विधवा महिला समाजाच्या मानसन्मानापासूनही दूर जातात. त्यांच्या आयुष्याला सन्मानाचे कुंदन लावण्याचा प्रयत्न सांगलीतील एका उपक्रमातून केला जात आहे. सुवासिनी प्रमाणे विधवा महिलांनाही वडाच्या झाडाचे पूजन करण्याकरता निमंत्रित केले असून अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन ही संकल्पना सांगलीत राबविण्यात येत आहे.

सांगलीच्या सिताराम नगर मधील एका उद्यानात हा कार्यक्रम आज 21 जून रोजी आयोजित केला आहे. यासाठी शहरातील 500 विधवा महिलांना निमंत्रित केले असून सिताराम नगर मधील अस्मिता पत्की यांनी विधवा महिलांचे संघटन करून 'सुवासिनी' नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून वटपौर्णिमेचा हा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती पत्की यांनी दिली.


वडाचे झाड हे ऑक्सिजनचा मोठा स्रोत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सर्वच महिलांना या झाडाचा सहवास हवा, अशी वैज्ञानिक जोड ही या पारंपारिक सणाला देण्यात आली आहे. विधवा महिलांनी त्यांच्या पतीचे स्मरण करून वडाच्या झाडाचे पूजन करावे, अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. सदर विधवा महिलांनीही संस्थेचे हे निमंत्रण स्वीकारले असून आज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सणांच्या परंपरेत विधवांना मान

याच संस्थेने संक्रातीच्या सणात विधवा महिला निमंत्रित करून हळदी कुंकवाचा समारंभ घेतला होता. आता सुवासिनींचा सण म्हणून या वटपौर्णिमेकडे पाहिले जाते, त्या सणाच्या परंपरेच्या धाग्यातही विधवा महिलांना गुंफले आहे.

सिताराम नगर येथील उषाताई आपटे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेमुळे आम्ही सुवासिनी नावाने विधवा महिलांचे संघटन केले आहे. हे संघटन व आमच्या उपक्रमातील सहभाग वाढत आहे. विधवा महिलांबाबत भेदभाव न करता त्यांना हे समाजात मान मिळायला हवा म्हणून आमची धडपड सुरू असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता पत्की यांनी दिली आहे.