Sangli Samachar

The Janshakti News

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेत योगदिन जोशात साजरा !


| सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - दि. २२ जून २०२४
..........................
विद्या कुलकर्णी (डोंबिवली )
.........................
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेत योग दिन साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक केले. त्याचबरोबर संगीताच्या तालावर विविध योगासाने सादर केली.यामध्ये दंडासन , वज्रासन, सर्वांगासन, पादासन, भुजंगासन ,अर्धचक्रासन, ताडासन अशा प्रकारची योगासने करून उपस्थितांना थक्क केले.

यावेळी शाळा समिती सदस्या ,सौ माधवी कुलकर्णी, सौ. दीपा आपटे, गोपाळ नगर शाळेचे माजी विद्यार्थी व पत्रकार अभिजीत पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा बोंडे, पर्यवेक्षिका सौ. जयश्री दौंड व्यासपीठावर उपस्थित होत्या.


प्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी 'शुभं करोति कल्याणम्' ही प्रार्थना अतिशय सुरेख आवाजात सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बोंडे मॅडम यांनी अष्टांग योगासने याविषयी माहिती सांगितली. यामुळे शरीर व मन बळकट बनते. बुद्धी तल्लख होते तर इंद्रियां वर नियंत्रण ठेवता येते असे म्हटले.

शाळा समिती सदस्य सौ. दीपा आपटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगासने दररोज घालावेत यासाठी माहिती सांगितली तसेच सौ. माधवी कुलकर्णी मॅडम यांनी स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी यांचे शरीर व मन कसे बळकट होते त्याप्रमाणे आपणही शरीर व मन बळकटीसाठी प्रयत्न करावेत व दररोज सूर्यनमस्कार घालावे असे सांगितले. श्री. अभिजीत पवार यांनी योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पाटोळे हिने तर आभार लावण्या बेंद्रे हिने मानले.