Sangli Samachar

The Janshakti News

सांगली-मिरज रस्ता कामाची होणार चौकशी, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे आदेश !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जून २०२४
सांगली-मिरज रस्ता हा ९५ टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे २९ कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली होती. याची गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने कोल्हापूर अधिक्षक अभियंता यांना गैरकारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत. 


सांगली-मिरज रस्त्यावर कायम वाहतूक कोंडीबरोबरच अपघात वाढल्याने हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्त्याशेजारी खासगी मिळकत संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी मोठा निधी खर्च लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे 10 किमी अंतराचा 95 टक्के सुस्थितीत असणा-या सांगली-मिरज रस्त्यासाठी सुमारे २९ कोटींचा निधीचा चुराडा केला जात आहे. केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करीत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी बांधकाम अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती. याची गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने या गैरकारभाराची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कोल्हापूर अधिक्षक अभियंता यांना दिले असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी दिली.