yuva MAharashtra जुन्या मल्लांना नवा मल्ल पडणार भारी, जातीय समीकरणावर ठरणार हातकणंगलेचा वस्ताद ?

जुन्या मल्लांना नवा मल्ल पडणार भारी, जातीय समीकरणावर ठरणार हातकणंगलेचा वस्ताद ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जून २०२४
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन माजी खासदारांबरोबर एक माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहे. येत्या 4 जूनला हातकणंगलेचा वस्ताद कोण ठरणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शेतकरी नेता म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याच मतदारसंघातून लोकसभेला सामोरे गेले आहेत.

मतदारसंघातील परिस्थिती पाहता पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, शिराळा आणि इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघात असणारी महाविकास आघाडीची ताकद ही शिवसेना ठाकरे गटाते उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयापर्यंत नेऊ शकते. तर सहा विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टींना मानणारा शेतकरी वर्ग तितकाच मोठा आहे. महायुतीमध्ये अंतर्गत धुसफुसीचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसू शकतो, असा राजकीय तज्ज्ञाचा अंदाज आहे.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात कोण? ही चर्चाही रंगली होती. महाविकास आघाडीशी फिस्कटल्याने शेट्टी यांनी सवता सुभा मांडला. कारखानादारांच्या अंतर्गत विरोधामुळे शेट्टी यांना दूर ठेवल्याचे सांगितले जाते. मागील लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणेही निर्णायक ठरली होती. यंदाही तोच फॅक्टर आहे. पण मराठा समाजाचा मत विभाजन करण्यास महाविकास आघाडीला यश आले.

महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील आणि महायुतीचे उमेदवारी खासदार धैर्यशील माने हे दोन्ही चेहरे मराठा आहेत. शिवाय याचं मतदारसंघात जैन मतदाराचा प्रभाव आहे. तसंच दलित मतदारदेखील निर्णायक ठरतात. तिरंगी लढत झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत झाली आहे. महायुतीचे उमेदवार यांच्याबाबत असणारी नाराजी त्याचं प्रमुख कारण ठरू शकते.

या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनेचीही (ठाकरे गट) स्वतंत्र ताकद आहे. शेतकरी संघटनेची मोठी ताकद या मतदारसंघात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जातीय समीकरणांचा प्रभाव जाणवला. त्यावेळी धैर्यशील माने यांचा विजय व शेट्टी यांचा पराभव झाला असला, तरीही वंचितची 1 लाखांपेक्षा जास्त मते विचार करायला लावणारी ठरली. त्यावेळी मुस्लिम चेहरा आणि वंचितची उमेदवारी असल्याने हा प्रभाव जाणवला. यंदा मात्र वंचित स्वतंत्र, महाविकास आघाडी, स्वाभिमानी आणि महायुती वेगवेगळे लढल्याने मतांचं विभाजन आणि उमेदवाराचा प्रभावच या ठिकाणी विजयी ठरू शकतो.