Sangli Samachar

The Janshakti News

शीळेवर गाण्यातील आनंद ! (✒️ राजा सांगलीकर)


सांगली समाचार वृत्त |
दि. २८ जून २०२४
एके दिवशी परगांवी जाण्यासाठी मी रेल्वे स्टेशनवर आलो. प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर माझा आरक्षित बैठक क्रमांक असलेल्या डब्यामध्ये मी प्रवेश केला. डब्यातील दोन्ही बाजूच्या सीटस् रिकाम्याच होत्या. माझा आरक्षित बैठक क्रमांक खिडकीपासून दूर सीटच्या एका टोकाला होता. पण खिडकीजवळची जागा रिकामी आहे हे पाहिल्यावर मी तिथे माझी बैठक जमवली.

थोड्या वेळाने ५५–६० वर्षांचा, बिन इस्त्रीचे कपडे घातलेला, साधारण व्यक्तिमत्वाचा, काळा-सावळासा एक गृहस्थ माझ्या जवळ आला आणि अत्यंत नम्रतेने मला म्हणाला, “माफ करा, ही माझी रिझर्व सिट आहे.”
कां कुणास ठाऊक पण हा गृहस्थ खुप आनंदी असावा असा विचार त्या गृहस्थाच्या बोलण्यावरून, आवाजावरून माझ्या मनात डोकावला. पण त्याकडे मी दुर्लक्ष केले. खिडकीजवळची जागा सोडावी लागल्याने मी थोडासा खट्टु झालो, मनामध्ये राग दाटुन आला.

‘बसलो असतो थोडा वेळ मी खिडकीजवळच्या जागेवर तर असा काय फरक पडला असता या गृहस्थाला?’

मनातल्या मनात चडफडत खिडकीपासून दूर, बाकाच्या एका टोकाला असलेल्या माझ्या जागेवर मी जाऊन बसलो. थोड्या वेळात दोन्ही बाकावरील सर्व जागा भरल्या. रेल्वे सुरू होऊन तिनेही वेग घेतला.

कांही वेळाने दाढीचे खुंट वाढलेला, तोंडाचे बोळके झालेला, गोल फ्रेमचा चष्मा लावलेला एक वृद्ध गृहस्थ, काठी टेकत माझ्या बैठकीजवळ येऊन थोडे सरकून जागा देण्यासाठी मला विनंती करू लागला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण तो तसाच माझ्या बाजुला उभा राहिला. खिडकीजवळ जागा असलेल्या त्या गृहस्थाने इशा-याने त्या वृद्ध माणसाला आपल्याजवळ बोलाविले व स्वतः थोडे सावरून बसून त्याला बसायला जागा करून दिली. माझ्या मनात विचार आलाः

‘अरे काय हा माणूस? मगाशी अशीच थोडी तडजोड करून मला खिडकीजवळ बसायला देता आले नसती कां याला? चांगुलपणाचे नाटक करतोय साला !’

रेल्वेच्या झुकुझुकु आवाजाची गती आणि माझ्या मनाची घुसफुस दोन्ही वाढू लागली. असाच काही वेळ गेला. आता ३०-३५ वयाची एक बाई माझ्याजवळ येऊन बसायला जागा मागू लागली. त्या बाईची बोलण्याची पद्धत, कपडे यावरून मी ओळखले. ही बाई मोलमजुरी करणारी आहे. साधे जनरल तिकीट घेऊन तशीच आरक्षित डब्यात घुसली आहे. अशा लोकांचा मला खूप राग येतो. आरक्षित जागेसाठी जादा पैसे मोजायची तयारी नाही पण; स्वतःच्या सोयीसाठी दुस-यांच्या आरक्षित जागेवर बसायला मात्र पाहिजे.

त्या गृहस्थाने मला खिडकीजवळच्या जागेवरून उठवल्याच्या माझ्या मनात साठलेल्या रागाच्या भरात मी त्या बाईला सुनावले, “हे बघा बाई, या सर्व जागा आरक्षित आहेत. आधीच तीन सिटच्या जागेवर आम्ही चार लोक कसेबसे दाटीवाटीने बसलो आहोत. तुमच्या सोयीसाठी तुम्ही आम्हाला कां त्रास देता? तुम्ही दुसरीकडे कुठं तरी जागा शोधा.”

माझा आवाज व बोलण्याच्या पद्धतीवरून ती बाई काय समजायचे ते समजली व तोंडातल्या तोंडात कांहीतरी पुटपुटत, बहुधा मला शिव्या घालत डब्याच्या दाराजवळ जाऊन उभा राहिली.
खिडकीजवळच्या त्या गृहस्थाने त्या वृद्ध गृहस्थाला व बाजूच्या प्रवाशाला कांहीतरी सांगितले व तो आपल्या जागेवरून उठून गेला आणि, दारात उभी असलेली मघाची ती कामवाली बाई त्या गृहस्थाच्या खिडकी जवळच्या सिटवर येऊन बसली. माझ्या रागाचा पारा पार चढला.

‘अरे, काय चालले आहे हे? आता हा गृहस्थ या बाईलापण इथे बसवणार की काय ? तीन बैठकींच्या जागेवर पाच-पाच लोक बसणार ? पैसे देऊन आपली गैरसोय कां करून घ्या ? इतर लोक कांही बोलत नाहीत, गप्प बसले आहेत, त्याचा गैरफायदा घेऊन हा गृहस्थ फुकटचा चांगुलपणा घेत सुटला आहे. नाही, नाही, हे थांबवलेच पाहिजे.’

रागाच्या तिरीमिरीत मी त्या बाईला परत एक वेळ सुनावले तेव्हा मोठ्या ठसक्यात ती बाई मला म्हणाली,

“काय बी काळजी करू नका सायेब. तुमच्या सारख्या मोठ्या माणसाची कायबी गैरसोय व्हणार न्हाई. म्या अशी अवघडल्या-सवघडल्याली बाई बघून त्या भल्या माणसानं मला हिथ बसायला सांगितलं आणि आपुन तिकड दाराजवळ हुभे –हाईले. पाहिजे तर जाऊन इचारा त्यांनास्नी. आपुन सोता मानुस्की दावायची न्हाई ते न्हाई आनि दुस-यांनी दावल्यालीबी बघवत न्हाई” ती बाई तडातडा बोलून गेली.

त्या बाईच्या शब्दांचा वार माझ्या मर्मी लागला, तसाच तिरमिरीत मी उठलो आणि त्या गृहस्थाकडे जाऊन स्वतः उभे राहून त्या बाईला जागा देण्याबद्दल विचारले, तेंव्हा तो म्हणाला,
“अहो, ती बाई गरोदर आहे. अशा अवघडलेल्या स्थितीतही बिचारी पैशासाठी मोलमजुरीचे काम करत आहे. अशा स्थितीमुळे अवघडलेल्या थोडा आराम मिळावा ही तिची स्वाभाविक इच्छा असणार, असा विचार करून मी त्या बाईंना बसायला जागा दिली. पण, त्यामुळे इतरांना जागेची अडचण होऊ नये असा विचार करून मी इथे येऊन उभा राहिलो.”

एवढे बोलून तो इसम वा-यावर भुरूभुरू उडणारे आपले केस सावरत ओठांचा चंबु करून शीळेवर कुठलेतरी गाणे गुणगुणु लागला.
माझा आवाज बंद झाला. पण आतापर्यंत साचून राहिलेल्या कटुविचारांची सारी मळमळ बाहेर पडली आणि मी त्या गृहस्थाला थोड्या रोशानेच विचारले,

“तुमचे विचार अगदी स्तुत्य दिसतात, पण कांही वेळापुर्वी तुम्ही माझ्या बाबतीत असे कां वागलात ? कां तुम्ही तुमच्या जागेवरून मला उठवलत?”

शीळ घालण्याचे थांबवून तो गृहस्थ मला म्हणाला,

“तुम्हाला हवी कां ती खिडकी जवळची जागा? ठिक आहे. थोड्या वेळाने त्या बाई किंवा ते वृद्ध गृहस्थ उतरून जातील मग बसा तुम्ही तिथे. मी बसेन तुमच्या जागेवर किंवा उभा राहीन असाच इथे दारात आणखी थोडावेळ, ही पळणारी माणसे, झाडे, घरे, दूरवर पसरलेली ही मखमली हिरवळ, निळ्या आकाशात सुळकी मारणारे डोंगर, त्यांच्या माथ्यावर डोके टेकून विसावलेले कापसासारखे पिंजलेले पांढरेशुभ्र ढग, भन्नाट वाहणारा वारा अशा कितीतरी छान-छान गोष्टी, बाहेरच्या गंमती-जमती बघत. वा! काय मस्त मज्जा वाटते नाही?”

दाराच्या बाहेर बघतच त्या गृहस्थाने उत्तर दिले आणि शीळेवरील गाण्याची धुन वाजवणे चालू ठेवले.

कांही क्षणांसाठी मी निःशब्द झालो आणि माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा उपस्थित झाला व म्हणाला,

“पाहिलेस राजा, स्वतःची आरक्षित खिडकी जवळची जागा दुस-याला देऊनही तो गृहस्थ कसा आनंदात शीळेवर गाणे म्हणत आहे आणि तू ? खिडकीजवळ जागा मिळाली नाही या क्षुल्लक कारणाने मानसिक क्षोभाच्या ज्वालात आनंदाची आहुती देत मनातल्या मनात कुढत बसला आहेस. तुला नाही वाटत आपणही असे शीळेवर गाणे वाजवावे? की तूला शीळ वाजवता येते हेच तू विसरला आहेस?”

बोलायला कांही न सुचल्याने मी तसाच गप्प राहिलो. पण वास्तविकता काय आहे हे मला चांगले माहित होते. शीळ वाजवायची तर दूर, कितीतरी दिवसात मी मनसोक्तपणे हसलोसुद्धा नव्हतो. खरं तर, आपणही त्या गृहस्थासारखे आनंदी असावे, गाणे गुणगुणावे, शीळ वाजवावी असे मला नेहमीच वाटते, पण.

माझ्या मनातील ‘तो’ कोपरा सांगू लागला

“राजा, त्या गृहस्थाप्रमाणे तू आनंदी होऊ शकत नाहीस याला कारण त्यागामध्ये आनंद असतो हेच तुला माहिती नाही. त्यागाचा अर्थः सर्वस्व सोडून देणे असा नसून मोठ्या आनंदाच्या प्राप्तीसाठी लहानसहान इच्छांना, सुखांना बाजूला करणे हा आहे. हे विसरून तू आजवर फक्त तुझी स्वतःची सोय पाहिलीस. स्वतःच्या सोयीसाठी उलट-सुलट विचार व तसेच उलटे-सुलटे व्यवहार केलेस. क्षुल्लक सोयीमध्येच सुख शोधत बसलास आणि लहान-सहान इच्छांचा त्याग करून जीवनात प्रत्येक क्षणाला मिळणा-या मोठ्या आनंदाला मात्र गमावलेस. खरं तर; तूलाही शिळ वाजवता येते हेच तू विसरून गेलास.”

आनंदी जीवनाचा मंत्र मला देऊन माझ्या मनातील ‘तो’ कोपरा जिथून आला होता तिकडे परतला आणि मी तिथेच दारामध्ये त्या गृहस्थाशेजारी उभा राहून शिळेवर गाणे वाजवत बाहेरची जमाडीजम्मत, भिरभिरणा-या वारे, पळणारी झाडे-डोंगरांची मज्जा लुटु लागलो.

- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण