Sangli Samachar

The Janshakti News

रात्री झोपताना बेंबीमध्ये तूप सोडल्याने होणारा फायदा डॉक्टरांनीच केला मान्य !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १८ जून २०२४
ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या असाइनमेंटपर्यंत, अगदी शाळेतल्या नोट्स सुद्धा अलीकडे ऑनलाईन उपलब्ध असल्याने साहजिकच स्क्रीन टाइम वाढला आहे. प्रत्येक वयोगटातील लोक दिवसातील तीन ते चार तास किंबहुना त्यापेक्षा जास्तच वेळ स्क्रीनसमोर घालवतात. काम उरकलं तरी मनोरंजनाची माध्यमे सुद्धा ऑनलाईनच असल्याने आपण निवांत असताना सुद्धा डोळ्यावर ताण येतच असतो. गंमत म्हणजे याच सोशल मीडियावर डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचेही उपाय उपलब्ध असतात. (आता ही माहिती सुद्धा तुम्ही ऑनलाईनच वाचताय हा वेगळा गमतीचा भाग झाला) यातीलच एक बहुचर्चित उपाय म्हणजे डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्या बेंबीमध्ये तेल किंवा तूप सोडणे. हा पारंपरिक उपाय असे सुचवतो की, तूप किंवा बदामाचे तेल आपल्या बेंबीत सोडल्याने डोळ्यांची कार्यक्षमता उत्तम राहते पण खरोखरच याचा फायदा होतो का, हे आता आपण जाणून घेणार आहोत.

७२ हजार नसांचा केंद्रबिंदू

नॅचरोपॅथ मेहर सिंग यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बेंबीचे महत्त्व अधोरेखित केले. आयुर्वेद आणि निसर्गोपचारानुसार, बेंबी शरीराचा मध्यवर्ती बिंदू म्हणून काम करते. इथूनच ७२ हजार नसा शरीराच्या विविध भागांशी जोडल्या जातात, ज्यामध्ये डोळ्यांकडे नेणाऱ्या ऑप्टिक मज्जातंतूचा समावेश असतो.

दृष्टी सुधारण्यासाठी तुमच्या बेंबीमध्ये, तूप किंवा बदामाचे तेल लावणे किती फायद्याचे आहे हे सांगताना डॉक्टर मेहेर सिंग म्हणाले की, डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देशी गायीचे तूप किंवा बदामाचे तेल वापरण्याची शिफारस केली जाते, म्हशीच्या दुधापेक्षा किंवा इतर प्रकारच्या गायींऐवजी देशी गायींचे तूप वापरण्यावर भर दिला जातो.


तेलापेक्षा तूप वापरणे का फायद्याचे ?

त्यांनी स्पष्ट केले की देशी गाईचे तूप अल्कधर्मी आहे आणि त्यात थंड करण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते अधिक योग्य बनते. दुसरीकडे, बदाम तेल आणि इतर तेलांमध्ये अम्लीय गुणधर्म असतात, बदामाच्या तेलामध्ये शरीराला उष्णता देण्याची क्षमता असते, ज्यामुळे ते एकवेळ हिवाळ्यात वापरणे विचारात घेता येऊ शकते पण उन्हाळ्यात याचा त्रास होऊ शकतो. यापेक्षा डॉक्टर सामान्यतः तेलापेक्षा तुपाचा वापर करण्याचा सल्ला देतात.

राहिला प्रश्न तुम्ही बेंबीला तूप कधी व कसे लावावे? तर, रोज रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईचे तीन ते चार थेंब तूप पोटाला लावावे. वेळोवेळी सातत्यपूर्ण वापर केल्याने डोळ्यांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकतात, ज्यामध्ये दृष्टी सामर्थ्य वाढू शकते. तरीही एक बाब लक्षात घ्या, अंधुक दृष्टी किंवा डोळ्यांशी संबंधित इतर समस्या असलेल्यांनी, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.