yuva MAharashtra महाराष्ट्राला हादरे बसणार; फुटलेले आमदार ठाकरेंकडे वळणार ?

महाराष्ट्राला हादरे बसणार; फुटलेले आमदार ठाकरेंकडे वळणार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे-पवारांना धक्क्यांवर धक्के देणाऱ्या शिंदे, फडणवीस, अजितदादांना निकालाच्या आकड्यांचे हदरे बसले. या हादऱ्यांनी बंडखोरांच्या अर्थात, ठाकरेंशी गद्दारी केलेल्या 4 डझन आमदारांच्या पोटात भीतीचा गोळाच आला असावा. परिणामी, दिल्लीने फितवल्याने आणि 'महाशक्ती'च्या धाकाने मूळ शिवसेनेतून फुटलेल्या आमदार आता पुन्हा 'मातोश्री'ची पायरी चढण्याची शक्यता राज्यातील एका बड्या नेत्याने वर्तविली.

थोडक्यात, शिंदेंचे काही आमदार ठाकरेंसोबत 'कनेक्ट' होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रात राजकारण हदरवणारा खेळ मांडला जाऊ शकतो. परंतु, या वृत्ताला शिंदेसमर्थक आमदारांनी उघडपणे दुजोरा दिला नाही. दुसरीकडे, 'गद्दारांना क्षमा नाहीं', या आनंद दिघेच्या स्टाइलने फुटीरांना बजावलेले ठाकरे कशी चाल करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे-पवारांना प्रचंड सहानुभूती असल्याचे चित्र दिसल्याने शिंदेसमर्थक आमदार अस्वस्थ होते. त्याआधी पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या सभा मेळाव्यातील गर्दीनेही बंडखोर आमदारांची धाकधूक वाढली होती. त्यात, ज्या ठाकरेंचे राजकीय अवसान गळून पडले; त्याच ठाकरेंनी राज्य पिंजून काढत, गद्दारांना इशारेवजा भाषा बोलून दाखवली. त्याला शिंदेंच्या मंत्री, आमदारांनी ठोशास-ठोशाच्या भाषेत परतफेड केली.


दुसरीकडे, बहुतांश मतदारसंघातील चर्चा, वातावरणावरून शिंदेसमर्थक आमदारांना ठाकरेंच्या ताकदीचा अंदाज आला होता. मात्र, तोवर वेळ निघून गेली होती. त्यानंतर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यभरात 19 सभा घ्याव्या लागल्या; त्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही प्रचार हायजॅक करीत महायुतीकडे पारडे जड ठेवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही ठाकरे-पवारांसोबतच्या सहानुभूतीला कोणीही धक्का लावू शकले नाही. ते निकालातून दिसून आले. सहानुभूतीच्या या लाटांवर लाटांना मोदी करिष्माही रोखू शकला नाही.

साहजिक हा निकाल शिंदे समर्थक आमदारांना विचार करायला भाग पाडणारा आहे. त्यातून विधानसभेच्या लढाई टिकून राहण्यासाठी फुटलेल्या आमदारांना धडपड करावी लागणार आहे. त्याच्या उद्देशाने काही मंडळी पुन्हा मंडळी पुन्हा ठाकरेंशी जुळवून घेण्याचा विचार करू शकते. मात्र, ठाकरे आणि शिंदेच्या आमदारांत प्रचंड बिनसल्याने पुन्हा घरोबा होण्याची शक्यता नाही. तरीही काही मुंबईसह मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाष्ट्रातील धक्कादायक निकाल पाहता शिंदेसमर्थक आमदार अशा काळात बाण खाली ठेवून आता मशाली पेटविण्यासाठी पुढे येतील. अर्थात, शिंदेंचे कुठचे आणि किती आमदार मशाल घेणार ? यासाठी पुढचे काही दिवस बारीक लक्ष ठेवून राहावे लागणार आहे.