सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जून २०२४
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नूतन खासदार विशाल पाटील यांच्या विजयात डॉ. विश्वजीत कदम यांची असलेली मोलाची साथ लपून राहिलेली नाही. त्यामुळे आता डॉ. विश्वजीत कदम यांचा हात ज्यांच्या पाठीवर त्याचे कोटकल्याण झालेच म्हणून समजा असा संदेश सध्या संपूर्ण जिल्ह्यात अनेक वायरल व्हिडिओ मधून पसरतो आहे.
असाच एक संदेश सांगलीतील लोकप्रिय यूट्यूब चैनल तिसरा डोळा मधून वायरल झाला आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून जल्लोष निर्माण झाला आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात डॉ. विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्याकडे पहात म्हटले 'भावी' आणि उपस्थितांतून जोरदार घोषणा झाल्या 'आमदार'...
हाच धागा पकडत डॉ. विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज बाबांकडे पहात म्हटले, "पृथ्वीराज पाटील तुम्ही आता तयारीला लागा. एका पाटलाला खासदार केले आहे, आता दुसऱ्या पाटलाला आमदार करायचे आहे."
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी तर पक्की झालीच परंतु आता त्यांना आमदार करायचेच, हा संदेशही काँग्रेस कार्यकर्त्यांमधून पोहोचवण्याचे काम या 'तिसरा डोळा' यूट्यूब चैनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून झाले आहे.