सांगली समाचार वृत्त |
कोलकत्ता - दि. ३० जून २०२४
पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये एका ३२ वर्षीय महिलेला विवस्त्र करून मारहाण प्रकरण समोर आले आहे. पीडित महिला पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीची उपाध्यक्ष असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. भाजपने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून या घटनेची चौकशी करण्यासाठी आपले पथक राज्यात पाठवण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर तृणमूलने भाजपवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावर स्थानिक पोलिसांनी म्हंटले आहे की, या प्रकरणाला चुकीची माहिती देऊन प्रकरण जातीयवादी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा कौटुंबिक वाद होता. असेही त्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणावर पीडितीच्या वडिलांनी सांगितल,’अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून शेजाऱ्यांनी माझ्या मुलीवर हल्ला केला. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शेजाऱ्याशी बराच वेळ वाद सुरू होता. त्यांनी माझ्या मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, ‘शिवीगाळ केल्यानंतर त्या लोकांनी तिला केसांनी ओढले, विवस्त्र केले आणि मारहाण केली. यानंतर तिला धमकावून रस्त्यावर सोडले.’ तिच्या वडिलांनी तक्रारीत कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव घेतलेले नाही. मात्र, नंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांची मुलगी भाजपची कार्यकर्ती असल्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला.
तर कूचबिहारमधील एमजेएन रुग्णालयात पीडितेने सांगितले की, ‘टीएमसी महिलांनी तिला नग्न केले आणि पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न केला. जर ती टीएमसीमध्ये सामील झाली नाही तर तिला आणखी त्रास दिला जाईल.अशी धमकी सुद्धा दिली. मी बेशुद्ध झाल्यावर मला सोडण्यात आले. 4 जूनपासून ते मला टार्गेट करत आहेत.’
दरम्यान, तीन महिलांसह चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फोटो काढणे आणि अफवा पसरवल्याप्रकरणी पीडितेच्या भावजयीलाही अटक करण्यात आली आहे. महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेला जातीय आणि राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला आणि गावातील महिलांमध्ये पूर्वी काही वादातून भांडण झाले होते. हाणामारीत पीडितेचे कपडे फाटले.