yuva MAharashtra एक्झिट पोल आणि शेअर बाजाराचं काय कनेक्शन, भाजपची मोठी खेळी कोणती ?

एक्झिट पोल आणि शेअर बाजाराचं काय कनेक्शन, भाजपची मोठी खेळी कोणती ?



| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. ३ जून २०२४
आपल्या आयुष्यात वैचारिक झटका बसत असतो. सार्वजनिक जीवनात पण आपण असे प्रकार पाहतो. पडद्यामागील गोष्ट, गोटातील बातमी अशा मथळ्याखाली आपल्या समोर जी माहिती येते, त्यातून धक्का नक्कीच बसतो. हे धक्कातंत्रच त्या माहितीचा आत्मा असतो. तर हे विस्तारुन सांगण्याचे कारण आहेत ते समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव. अखिलेश यादव यांनी केलेले हे वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काय आहे वक्तव्य?

एक्झिट पोल साफ झूठ

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी येईल. त्यापूर्वी एक्झिट पोल शनिवारी जाहीर झाले. एक्झिट पोलने एकजात भाजपला बहुमत देऊन टाकले आहे. अर्थात इंडिया आघाडीला पण बऱ्यापैकी गुण दिले आहेत. पण या एक्झिट पोलवर इंडिया आघाडीने साफ झुठचे भलेमोठे लेबल लावले आहे. ही आकडेवारी बोगस असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकसभेत इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील असा दावा करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या एक्झिट पोलवरुन निशाणा साधला आहे. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक्झिट पोलची क्रोनोलॉजी, सहेतू घटनाक्रम उलगडून दाखविला आहे.


अखिलेश यांच्या दाव्याने खळबळ

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक्झिट पोलवर सवाल उभे केले आहेत. त्यांनी एक्झिट पोलची क्रोनोलॉजी पण समजावून सांगितले. अर्थात त्यांच्या दाव्याने वाद उभा ठाकला आहे. भाजपाई मीडिया भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील हे सांगणार हे आम्ही अगोदरच स्पष्ट केले होते, असे अखिलेश म्हणाले. या 300 जागांच्या दाव्यामुळे भाजपला घोटाळा करण्याची संधी मिळणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आताचा हा एक्झिट पोल कित्येक महिन्याअगोदरच तयार करण्यात आला होता. वृत्तवाहिन्यांवर तो आता दाखविल्या जात आहे, इतकेच, असा दावा त्यांनी केला.

शेअर बाजाराशी एक्झिट पोलचे कनेक्शन

या एक्झिट पोलच्या माध्यमातून जनमताला, लोकांना धोका देण्यात येत आहे. एक्झिट पोलचा वापर करुन सोमवारी उघडणाऱ्या शेअर बाजारात जाता जाता मोठा लाभ पदरात पाडून घेण्याची ही चाल असल्याचा आरोप त्यांनी केला. जर हे एक्झिट पोल खोटे नसते आणि खरोखर भाजपचा पराभव होत नसता तर भाजपाने आपल्याच लोकांना दोष दिला नसता. भाजप नेते, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील निराश सत्य सांगत असल्याचे अखिलेश यादव म्हणाले.