| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दहापैकी सहा ते सात जागा जिंकेल, असा अंदाज मतदानोत्तर एक्झिट पोलनुसार व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांचा पक्ष बारामती, माढा, सातारा, शिरूर हे बालेकिल्ला पुन्हा राखणार हे सिद्ध होत आहे, त्यामुळे पवारांच्या तुतारीचा पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार हे स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीतील जागा वाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या दहा जागा मिळाल्या होत्या. त्यात भिवंडी, बीड, बारामती, माढा, सातारा, वर्धा, दिंडोरी, रावेर, नगर, शिरूर या मतदारसंघाचा समावेश होता. या दहा पैकी सहा ते सात जागांवर शरद पवार यांचा पक्ष आघाडीवर राहील, असा अंदाज टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृतसंस्थांचे मतदानानंतरचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात टीव्ही नाईन आणि पोलस्ट्राट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शरद पवार यांच्या पक्षाबाबत मतदारसंघनिहाय अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या पोलनुसार माढा, सातारा, नगर, बारामती, दिंडोरी, शिरूर या मतदारसंघातील पवारांचे उमेदवार आघाडीवर राहतील, तर बीड, रावेर, भिवंडी आणि वर्ध्यातील उमेदवार पिछाडीवर राहण्याचा अंदाज आहे.
माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. सातारा पुन्हा एकदा पवारांची जादू चालणार असल्याचे दिसते. या ठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर, पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर राहण्याचा अंदाज आहे.
बारामतीत सुप्रिया सुळेंचीच बाजी ?
बारामती खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकादा आघाडी राखतील, तर सुनेत्रा पवार ह्या पिछाडीवर असल्याचे म्हटले आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे जायंट किलर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, ते केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यापेक्षा आघाडीवर असल्याचा एक्झिट पोल सांगतो. त्याचप्रमाणे बलाढ्य डॉ. सुजय विखे यांच्यापेक्षा नीलेश लंके हे वरचढ ठरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा शिरूरमधून बाजी मारणार असल्याचा अंदाज या पोलमध्ये करण्यात आलेला आहे.
दरम्यान, बीडमधून बजरंग सोनवणे, रावेरमधून श्रीराम पाटील, भिवंंडीतून बाळ्यामामा म्हेत्रे आणि वर्ध्यातून माजी आमदार अमर काळे हे पिछाडीवर राहतील, असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आलेला आहे. एकंदरीतच शरद पवार हे आपले बालेकिल्ला पुन्हा एकदा मजबूत राखतील, असा अंदाज या पोलनुसार व्यक्त होत आहे.