| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा आनंद आहे. राज्यातील जनतेला न्याय मिळावा यासाठी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका एकत्र लढेल, असे सांगतानाच आम्ही काही जागा मित्रपक्षांसाठी सोडायला नको होत्या, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. राज्यातून निवडून आलेल्या खासदारांचा सत्कारसमारंभ शुक्रवारी (ता. ७) मुंबईतील गांधी भवनात आयोजित केला आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि संघटन प्रमुख आशीष दुआ यात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दुआ म्हणाले, ''महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. आमच्या पक्षाच्या इतिहासातील अनेक घटना या राज्यात घडल्या आहेत. काँग्रेसला नवसंजीवनी मिळत असताना महाराष्ट्राने भरभरून दिले. भाजपला नामोहरम करण्यासाठी आम्ही सर्व मित्रपक्षांना एकत्र आणले. पण सांगलीची जागा मित्रांनी घेतली तरी आम्ही परत मागायला हवी होती. निकालांनी ते सिद्ध केले आहे.''
''आमचा बालेकिल्ला असलेला वर्धा तसेच भिवंडीची जागा आम्ही सोडायला नको होती. मुंबईतील ईशान्य आणि विशेषतः दक्षिण मध्य मतदारसंघातही आमची ताकद आहे. या जागाही आम्ही मित्रपक्षांसाठी सोडायला नको होत्या. त्या जागा 'मविआ'ने जिंकल्या याचा आनंद आहे. मात्र महायुतीने जिंकलेल्या काही जागा मात्र आम्ही मित्रपक्षांना दिल्या नसत्या तर त्या जिंकून खासदारांची संख्या वाढली असती. काँग्रेसला जागा वाढवायची इच्छा होती,'' हे दुआ यांनी स्पष्ट केले.
'मविआ'चे सामूहिक यश
'मविआ'ला मिळालेला विजय हे सामूहिक यश असल्याचे सांगत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहकार्याचा उल्लेख चेन्निथला यांनी आवर्जून केला.
आता १५० जागा जिंकू
लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुमारे अडीच महिने सुरू होती. आता विधानसभेसाठी तेवढा वेळ हाती नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष विधानसभेत १५० जागा जिंकेल, असा दावा केला. काँग्रेसने लोकसभेत जिंकलेल्या जागांची संख्या लक्षात घेता हा आकडा योग्य आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. पुणे आणि नागपूर या जागाही जिंकणे अपेक्षित होते. काय झाले ते बघू, असे पटोले म्हणाले.