सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. ७ जून २०२४
पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाही, 70 टक्के कुटूंब एका बाजूला तर एक कुटूंब एका बाजूला आहे. अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं धक्कादायक विधान पवार कुटुंबातील सून आणि आमदार रोहित पवार यांची आई, सुनंदा पवार यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामतीच्या लढतीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आणि सुरू झालं आरोप-प्रत्यारोपांच राजकारण. लोकसभा निवडणूकीची घोषणा होताच अजित पवार यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार उभं करणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. पवार वि. पवार असा सामना रंगलेल्या बारामतीमध्ये निवडणुकीसाठी अक्षरश: घमासान युद्ध सुरू झालं. अजित पवार वि संपूर्ण पवार कुटुंब असं चित्र दिसलं. यावेळी अजित पवारांनी अनेक आरोपही केले.
मात्र बारामती निवडणुकीत विजय झाला तो सुप्रिया सुळे यांचाच. तय्यांनी सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने हरवलं. झालं गेलं गंगेला मिळालं अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतल्यामुळे आता पवार कुटुंबातील दरी सांधली जाईल का, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घोळू लागले आहेत. मात्र आमदार रोहित पवारांची आई आणि पवार कुटुंबातील सून, सुनंदा पवार यांच्या बोलण्यावरून हे सध्या तरी शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणाल्या सुनंदा पवार ?
खरंतर इलेक्शनची जेव्हा घोषणा झाली आणि बारामतीमधील उमेदवाराची जेव्हा घोषणा झाली, त्याच्याआधीपासूनच आमचं कुटुंब खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलं आहे.
त्यामुळे विलक्षण तणाव होता. पण निवडणुकीला सामोरं जायचं होतं. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही ठरवलं होतं की (शरद पवार) साहेबांच्या सोबत रहायचं. 70 टक्के कुटूंब साहेबांसोबत आहे आणि वैचारिक भूमिका बदलल्यामुळे एक कुटुंब बाजूला गेलं आहे.
एरवी सण-समारंभाला एकत्र येणं ठीक आहे पण आता वैचारिक मतभेद एवढे झाले आहेत, मन एवढी दुखावली आहेत, भाषेचा स्तर खूप खाली गेला आहे, त्यामुळे जखमा खूप झालेल्या आहेत, त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये. अजितदादा ज्या भूमिकेच्या बाजूला गेलेत, ते अजितदादांना एकत्र येऊ देणार नाहीत, असं त्या म्हणाल्या.