| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जून २०२४
आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सव्वा सात वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. नरेंद्र मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे 52 ते 55 मंत्री आज शपथ घेतील असं समजतंय. यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि 33 ते 35 राज्यमंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींसह आज 50 ते 55 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाबाबत फोन येण्यास सुरूवात झालीय.
मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. अमित शाह, राजनाथसिंह, नितीन गडकरींसह तेलगू देसमच्या दोघांना, जेडीयूचे एक, लोकजनशक्ति पार्टी (रामविलास)चे चिराग पासवान, जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना शपथविधीसाठी फोन आलाय. त्याचसह एनडीएतील हिंदुस्तान आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोकदल, अपना दल, ऑल झारखंड स्टुडंट्स, युनिअनच्या नेत्यांनाही फोन आलाय.
आतापर्यंत कुणाकुणाला फोन आलेत ?
जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
अनुप्रिया पटेल, अपना दल
डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
अमित शाह, भारतीय जनता पार्टी
अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत
महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावंही चर्चेत आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तर काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल मंत्रिपदावर विराजमान होतील अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय.