Sangli Samachar

The Janshakti News

शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे - आ. विश्वजीत कदम !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार बड्या कंत्राटदारांना पोहोचणारे असून शक्तीपीठ महामार्ग हा याचसाठी तयार करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी करीत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले. 

यावेळी बोलताना माजी मंत्री व काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम म्हणाले ते वर्धा ते गोवा महाराष्ट्रातील 85 हजार कोटी रुपये यांचा शक्ती पीठ महामार्ग जो राज्य शासनाने हाती घेतलेला आहे हा महामार्ग हाती घेत असताना त्यातले बारकावे राज्य शासनाने खरं प्रशासनाला आणि त्या त्या जिल्ह्यातील, त्या त्या तालुक्यातील आणि हा महामार्ग ज्या रस्त्यातून जातो तिथल्या शेतकऱ्यांना तिथे स्थानिक गावातील लोकांना  विश्वासात घेणं आवश्यक होतं. वास्तविक पाहता खरंतर इतका मोठा 85000 कोटीचा प्रकल्प हाती घेत असताना इथल्या शेतकऱ्यांच्या, लोकांच्या भावना महत्त्वाच्या होत्या. परंतु असं लक्षात आलं आहे की, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात महामार्गात जाणार आहे. ज्या शेतीच्या बळावर शेतकऱ्यांचा प्रपंच चालत असतो, आज त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर घाला घातला गेला आहे. 


अशा परिस्थितीत येथील हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, आम्ही आंदोलन केलं आहे. या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे इथे येत असताना, शेतकऱ्यांना त्यांची गाडी अडवावी लागली. त्यानंतर खाडे साहेबांनी उतरून इथं निवेदन घेतलं. हरकत नाही. पण आमच्या तीव्र भावना आहेत की, शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे. अन्यथा शासनाने इथल्या स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन बाधित शेतकऱ्यांना चांगला मोबदला देऊन मगच जमिनी हस्तांतरित केल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार. कदम यांनी केली.

दरम्यान पालकमंत्री या ठिकाणी येत असताना शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी बाळाचा वापर करून, शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत पोलिसांचा निषेध केला.

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले व आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले. या आंदोलनासाठी आ. विश्वजीत कदम, यांच्याबरोबरच खा. विशाल पाटील, आ. सावंत, आ. अरुण अण्णा लाड, पृथ्वीराज पाटील, महेंद्र आप्पा लाड तसेच शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महामार्गात जमिनी जाणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.