| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जून २०२४
शक्तिपीठ महामार्ग पद्माळे, सांगली व सांगलीवाडीच्या पूरपट्ट्यातून जाणार असल्याने शहरासाठी हा रस्ता नवी समस्या बनू शकतो. त्यामुळे महामार्गाची जबाबदारी असलेल्या संबंधित शासकीय यंत्रणेशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत केली.
सांगलीतील महापालिकेच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील सामाजिक संस्थांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता होते. यावेळी किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख यांनी शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन करत असताना आपत्तीला निमंत्रण देणाऱ्या नियोजित महामार्गाबाबत फेरविचार हाेण्याची आवश्यकता आहे.
हा मार्ग माधवनगरच्या पश्चिमेकडून पद्माळे, कर्नाळ रस्त्यावरून सांगली, सांगलीवाडी अशा पूरपट्ट्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाईल. या भरावामुळे शहराच्या गावठाणाला महापुराचा मोठा धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याविषयी तातडीने निर्णय आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण व रॉयल बोट क्लबचे दत्ता पाटील यांनी प्रशासनास सर्व सहकार्य करण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले. माजी सभागृह नेत्या भरती दिगडे म्हणाल्या, पूरकाळात शहरातील वाहतुकीबाबत, तसेच पाळीव प्राण्यांच्या काळजीबाबत प्रशासनाने सक्त सूचना देणे आवश्यक आहे. माजी नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले, पूरपट्ट्यातील नाले चुकीच्या प्रकारे वळवू नयेत. यासाठी प्रशासनाने पाहणी करून पूर परिस्थितीपूर्वी दक्षता घ्यावी. सांगलीकर म्हणून आम्ही पक्ष आणि अन्य मतभेद बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशासनाच्या बरोबर काम करण्यास तयार आहोत. अनिरुद्ध पाटील, रोनक हर्षद, सचिन साळुंखे यांनी प्राण्यांच्या स्थलांतरासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट केले.
सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी आपत्तीमध्ये महापालिका क्षेत्रात वैद्यकीय सेवा देण्याची तयारी दर्शविली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, विशेष कार्यकारी अधिकारी नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते.
एकत्रित मदत संकलन हवे
नागरिक जागृती मंचतर्फे सतीश साखळक म्हणाले, सांगली आपत्ती व्यवस्थापन समिती करून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही आलेली मदत एकत्र करून ती निवारा छावणीत वितरित करावी. एक सेंट्रल किचन करून तेथूनच सर्व ठिकाणी जेवण, चहापाणी, नाश्ता वितरित करण्यात यावा. याबाबत योग्य तो निर्णय महापालिकेने घ्यावा.