yuva MAharashtra शरद पवार गटाची विधानसभेची तयारी फुलप्रूफ; रोहित पवार !

शरद पवार गटाची विधानसभेची तयारी फुलप्रूफ; रोहित पवार !



सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. ८ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा राहिला आहे. राज्यात त्यांनी नवीन चिन्ह 'तुतारी'वर लोकसभेच्या १० जागा लढवल्या आणि त्यांचे आठ खासदार विजयी झाले आहेत.

कालच त्यांच्या सर्व खासदारांची मुंबईत बैठक झाली. शरद पवारांच्या नेतृत्वातील या बैठकीत सर्व खासदारांचे स्वागत करण्यात आले. सुप्रिया सुळे या काल पुण्यात होत्या त्यामुळे आठ पैकी त्या एकमेव खासदार अनुपस्थित होत्या. मात्र या बैठकीनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे किती आमदार शरद पवार गटात येणार याची.

आज बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे जंगी स्वागत झाले. त्याआधी रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांची आई सुनंदा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी रोहित पवारांनी शरद पवार गटाची विधानसभेची रणनीती ठरली असल्याचे सांगत अजित पवार गटाचे 18-19 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला.

शरद पवारांचा प्लॅन काय?

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले की, "30 उमेदवार साहेबांनी ठरवलेत. काही मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल झालेत. 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यातले किती घ्यायचे ते शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील."


आगामी राजकारण हे महत्त्वाचं असल्याचं म्हणत रोहित पवार म्हणाले, की आगामी काळात, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समिती, कारखाने, सहकारी संस्था या सर्व ठिकाणी लक्ष घालावे लागणार आहे. यात स्वतः पवार साहेब लक्ष देणार आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून तिथे काम करणार. विधानसभेचा निर्णय शरद पवार घेणार आहे, असे रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांकडून अभिनंदनाचे फोन येत आहे. आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत होतो तेव्हा कोणाचेही शुभेच्छांचे फोन आले नाही. आता अचानक अभिनंदनाचे फोन का सुरु झाले, असा सवाल करत रोहित पवार म्हणाले की, "अजित पवार आता भाजपसोबत गेले आहे. त्यांनी विचारधारा बदलली आहे. महाराष्ट्रातील जनता ही शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेची जनता आहे. त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे मारुन-मुटकून नेलेले, खोट्या काही गोष्टी सांगून नेले आहेत. त्यातील काही परत येत असतील तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे. पण जे परत येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी शेवटचे पंधरा दिवस आहेत. येत्या १५ दिवसांतच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण जे नेते सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या पाठीमागे शरद पवार उभे राहाणार आहे."

अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना परत एन्ट्री नाही, असे स्पष्टकरत रोहित पवार म्हणाले, की या निवडणुकीत त्यांनी शरद पवारांवर वैयक्तिक टीका केली. पक्षाच्या विचारधारेविरोधात भाषणे केली, त्यांना घेऊन काही फायदा नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.