Sangli Samachar

The Janshakti News

नालंदा विद्यापीठाला खिलजीने आग का लावली ? काय आहे नालंदाचा इतिहास ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जून २०२४
जगातले सर्वोत्कष्ठ विद्यापीठ म्हटलं तर आज आपल्या डोळ्यासमोर ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठांची नावं येतात. प्रबोधनकाळात युरोपमध्ये अनेक मोठमोठी विद्यापीठं उदयास आली. पण त्याच्या शेकडो वर्षांपूर्वी भारतातही एक विद्यापीठ होते ज्या ठिकाणी जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी यायचे. बिहारमधील नालंदा विद्यापीठ असं त्याचं नाव असून ते प्राचीन काळातील जगातील पहिलं मोठं विद्यापीठ असल्याचं मानलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विद्यापीठाच्या नव्या कँपसचे उद्धाटन केल्याने हे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बौद्ध तत्वज्ञानासह जगभरातील सर्व शास्त्रांचे ज्ञान देणाऱ्या विद्यापीठाला अफगाणी आक्रमक बख्तियार खिलजी (Muhammad Bakhtiyar Khalji) याने आग लावली आणि एक मोठा अध्याय संपवला. त्या काळातील सर्वोत्कृष्ठ असलेल्या नालंदा विद्यापीठाचा इतिहास (Nalanda University History) काय आहे हे जाणून घेऊयात. 

एकाच वेळी 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते

एक काळ असा होता की जगभरातील विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी नालंदा विद्यापीठात येत होते. नालंदा विद्यापीठाची स्थापना गुप्त सम्राट कुमारगुप्त पहिला याने इसवी सन 450 मध्ये केली होती. नालंदा विद्यापीठात एकेकाळी 90 लाख पुस्तके होती आणि जगभरातून सुमारे 10 हजार विद्यार्थी नालंदा येथे शिक्षण घेण्यासाठी राहत असल्याची नोंद आहे. 

नालंदा युनिव्हर्सिटी हे स्थापत्यकलेचेही अप्रतिम उदाहरण आहे. या विद्यापीठात 300 खोल्या, 7 मोठे हॉल आणि अभ्यासासाठी एक विशाल 9 मजली ग्रंथालय असल्याची नोंद आहे. गुप्त साम्राज्याचा कालखंड भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ बनवण्यात नालंदा विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात भारतातील आणि जगभरातील विद्वानांचा समावेश होतो.आर्यभट्ट, शांतीरक्षित, नागार्जुन, ह्युएन त्सांग यांच्यासह अनेक विद्वानांनी येथे शिक्षण घेतलं आहे.

परदेशातून विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी

नालंदा विद्यापीठात केवळ भारतातूनच नव्हे तर जपान, चीन, कोरिया, तिबेट, इंडोनेशिया, इराण, ग्रीस, मंगोलिया आदी देशांतून विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी यायचे. गुप्त घराण्याच्या अस्तानंतर हर्षवर्धन आणि पाल घराण्याच्या राजवटीत या विद्यापीठाची भरभराट होत राहिली आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली.

नालंदा विद्यापीठात साहित्य, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, कायदा, विज्ञान, तत्त्वज्ञान, गणित, अर्थशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, आयुर्वेद, योग हे विषय शिकवले जात. ह्युएन त्सांग सारख्या चिनी विद्वानांनीही भारतात आल्यानंतर नालंदा विद्यापीठाचे कौतुक केले आणि त्याची जगातील सर्वोत्तम विद्यापीठ अशी नोंद केली. 

प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागायची

त्या काळात नालंदामध्ये प्रवेश मिळणे फार कठीण होते. येथे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर तोंडी मुलाखत द्यावी लागायची, त्यांचे ज्ञान सिद्ध करावे लागले. धर्मपाल आणि सीलभद्र हे त्याकाळचे भारतातील प्रख्यात विद्वान आणि बौद्ध गुरू मानले जायचे, ते नालंदामध्ये शिकवत असायचे. 

नालंदाच्या लायब्ररीतील नऊ दशलक्ष हस्तलिखित, पामच्या पानावरील हस्तलिखिते हे जगातील बौद्ध ज्ञानाचे सर्वात श्रीमंत भांडार समजले जायचं. एकदा दलाई लामा म्हणाले होते की, आपल्याकडे जे काही ज्ञान आहे, त्याचा स्रोत नालंदामधून आला आहे.

जग बदलण्यात नालंदाची भूमिका

भारतीय गणिताचे जनक मानले जाणारे आर्यभट्ट यांनी इसवी सन सहाव्या शतकात या विद्यापीठात शिक्षण घेतल्याचा संदर्भ सांगतोय. आर्यभट्टांनीच जगाला शून्याची ओळख करून दिली आणि शून्याला संख्या म्हणून मान्यता दिली ही एक क्रांतिकारी संकल्पना होती. या शून्यामुळे गणितीय आकडेमोड सुलभ झाली आणि बीजगणितासारखे अधिक जटिल विषय विकसित करण्यात मदत झाली. आर्यभट्टच्या शोधामुळे दक्षिण भारत आणि संपूर्ण अरबी द्वीपकल्पात गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासाला चालना मिळाली. संपूर्ण आशियामध्ये बौद्ध शिकवणी आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यात नालंदाने महत्त्वाची भूमिका बजावली.

विद्यापीठाला आग का लावली ? 

अफगाण लष्करी जनरल बख्तियार खिलजी याने 1190 च्या दशकात नालंदा विद्यापीठाचा नाश केला. इतिहासकार सांगतात की एकदा बख्तियार खिलजी खूप आजारी पडला. त्याच्या डॉक्टरांनी बख्तियारवर खूप उपचार केले, पण उपयोग झाला नाही. कोणीतरी बख्तियार खिलजी यांना नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्रजी यांच्याकडून उपचार करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जेव्हा आचार्य राहुल श्रीभद्रजी यांना बोलावले तेव्हा बख्तियार खिलजीने त्यांच्यासमोर एक विचित्र अट ठेवली की त्यांनी दिलेले कोणतेही आयुर्वेदिक औषध खाणार नाही. 

आचार्यांनीही खिलजीची अट मान्य करून फक्त कुराण वाचण्याचा सल्ला दिला. पण कुराण वाचल्यानंतर तो बरा झाल्याचे सांगितले जाते. असं सांगितलं जातं की आचार्य राहुल श्रीभद्रजी यांनी त्या कुराणाच्या पानांवर औषध लावलं होतं. ते औषध खिलजीच्या हातापर्यंत पोहोचायचे आणि जेव्हा पाने उलटण्यासाठी हाताचे बोट जिभेवर ठेवायचा तेव्हा ते औषध खिलजीच्या तोंडात जात असे. अशा प्रकारे बख्तियार खिलजी बरा झाला. 

बख्तियार खिलजीला हे समजले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की भारतीय विद्वान आपल्या डॉक्टरांपेक्षा जास्त ज्ञानी आहेत. नालंदातील ज्ञान हे इस्लामशी स्पर्धा करत आहे असं खिलजीला वाटलं. त्यामुळे खिलजीने नालंदा विद्यापीठ परिसराला आग लावली. 

असेही मानले जाते की नालंदाच्या काळात बौद्ध धर्म आणि त्याची शिकवण वेगाने पसरत होती. म्हणून बौद्ध धर्म संपवण्यासाठी खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली. 

नालंदाचे अवशेष आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाले आहेत. या ऐतिहासिक ज्ञान केंद्राचे अवशेष पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. नालंदा युनिव्हर्सिटीचा परिसर एवढा मोठा होता आणि त्यात इतकी पुस्तके होती की हल्लेखोरांनी लावलेली आग तीन महिने धगधगत राहिली. या आगीने केवळ शिक्षण केंद्रच जाळले नाही तर शतकानुशतके ज्ञान आणि वारसाही नष्ट केला.