सांगली समाचार वृत्त |
फोंडा - दि. २६ जून २०२४
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या थडग्याभोवती अवैध दर्ग्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्याखेरीज १९ खोल्याही दर्गा परिसरात बांधण्यात आल्या होत्या. या दर्ग्यामध्ये महागड्या काचेच्या हंड्या लावण्यात आल्या होत्या, तसेच मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण करण्यात आले होते. आतंकवाद कशाप्रकारे संपावावा लागतो ? हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या गडावर अफझलखानाचा वध करून दाखवून दिले, त्याच गडावर असे अतिक्रमण होणे हे संतापजनक होते.
या विरोधात मी वर्ष २००१ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत आवाज उठवला, तसेच ‘श्री शिवप्रतापभूमीमुक्ती आंदोलन’ चालू केले. यात हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा समावेश होता. आंदोलन चालू झाल्यावर ३ वेळा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही काँग्रेसच्या कार्यकाळात हे अवैध बांधकाम पाडण्यात आले नाही. राज्यात भाजप-शिवसेनेचे हिंदुत्वनिष्ठ शासन आल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा घेतला. शेवटी १० डिसेंबर २०२३ या दिनांकानुसार असलेल्या शिवप्रतापदिनाच्या दिवशी हे सर्व अतिक्रमण तोडण्यात आले.
याचप्रकारे यापुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी व्यक्त केले. ते ‘महाराष्ट्रातील प्रतापगड आणि विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात केलेले प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मध्य प्रदेश राज्यातील हिंद रक्षक संघटनेचे इंदोर येथील अध्यक्ष श्री. एकलव्य गौडा, सर्व ब्राह्मण महासभेचे संस्थापक पंडित सुरेश मिश्रा आणि राजस्थान येथील संयुक्त भारतीय धर्म संसदेचे अध्यक्ष आचार्य राजेश्वर उपस्थित होते.
विशाळगडावरही अनेक अवैध बांधकाम झाली आहेत. गडावर कोंबड्यांचा बळी देण्यात येतो. यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट होते. या संदर्भातही आम्ही ‘विशाळगडमुक्ती आंदोलन’ उभे केले. या आंदोलनाच्या माध्यमातून विशाळगडावर जी १६४ अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती तात्काळ पाडावीत, विशाळगडावरील स्मारके-मंदिरे यांची जिर्णाेद्धार करावा, पशूबळी देणे तात्काळ बंद व्हावे या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सध्या तेथील पशूबळी बंद असून अतिक्रमण हटवेपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहिल. या प्रसंगी उपस्थितांनी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे !’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.