Sangli Samachar

The Janshakti News

'महाराष्ट्रात सध्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचं सरकार', भाजपचं टेन्शन वाढलं !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जून २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात देखील अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने ज्या पद्धतीचा कौल दिला आहे त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी अर्थात India आघाडीचा उत्साह वाढला आहे. कारण राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांववर विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या याच निकालावर जर नजर टाकली तर आज घडीला विधानसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी 150 हून अधिक जागा जिंकण्याची शक्यता असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका, महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीबाबत तज्ज्ञांचं नेमकं मत काय आहे ते हेच आपण जाणून घेऊया.

महाविकास आघाडी जिंकू शकते 150 जागा

लोकसभा निवडणुकीतील निकालांनी महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याचे स्पष्ट झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या 13 खासदारांनी विजयाची नोंद केली आहे, तर मूळचे काँग्रेसचे असलेले अपक्ष खासदार विशाल पाटील हे देखील आता संसदेत पोहोचले आहेत.


भाजपबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील ही त्यांच्या मागील गेल्या 10-15 वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी आहे. या निवडणुकीत भाजपने राज्यात 28 जागा लढवल्या होत्या. ज्यापैकी त्यांना फक्त 9 जागा जिंकता आल्या. त्यामुळे भाजपमध्ये घबराट निर्माण झाल्याचे पत्रकार सूर्यवंशी यांचे मत आहे. पुढे ते म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात 288 पैकी 150 जागा जिंकू शकतं. तर महायुती 130 जागापर्यंतच सीमित राहू शकतं.

महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात वातावरण

'राज्यातील राजकीय वातावरण हे महायुतीच्या विरोधात आहे. त्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात खूप काम करण्याची गरज आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभा निवडणुकीत जो कल आपल्या विरोधात होता तो भविष्यातही दिसण्याची शक्यता आहे. जसे की, शेतकरी आंदोलन, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण.' असंही ते यावेळी म्हणाले. 

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वावर मोठे संकट आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा अत्यंत कठीण आणि अडचणीचा काळ असल्याचे मत सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढवणार विधानसभा निवडणूक

महाराष्ट्रात यंदा निवडणुका होणार असून, त्यासाठी सर्वच पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. नुकतीच महाविकास आघाडीने जी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांनी निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून बहुमतासाठी 145 जागा आवश्यक आहेत. आजची परिस्थिती आणि तज्ज्ञांचे आकलन पाहिल्यास महाविकास आघाडीचे निकाल सर्वांनाच धक्का देणारे ठरू शकतात.