Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या निकालावरुन आता धडा घ्या, पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरेंना टोला !


| सांगली समाचार वृत्त |
कराड - दि. १८ जून २०२४
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी केली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीचा 180 जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे. जागा वाटप करताना ताणाताणी करुन चालणार नसून सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा, असे सूचक वक्तव्य करत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला.

कराड येथे कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री चव्हाण आले होते. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, सांगली लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महाविकास आघाडीत चुका घडल्या होत्या. त्या चुका टाळण्याचा यावेळी प्रयत्न आहे. निवडून येण्याचा निकष ठेवून जागा वाटप करण्यासाठी आघाडीने प्रयत्न केले पाहिजेत, असा आपला प्रयत्न आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडे असताना शिवसेनेने ती जागा घेतली. त्यामुळे पक्षात नाराजी उफळली होती. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसून आला.


सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्याठिकाणी अपक्ष उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या, कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात तिकीट देऊ नये हा धडा सांगलीतून घेतला पाहिजे, असा टोला चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सातार्‍यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात कमी पडल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

महाविकास आघाडी ज्या ताकदीनं लोकसभा निवडणूक लढली, त्यापेक्षा अधिक ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आता आम्ही 158 विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहोत. आमचा प्रयत्न 180 जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस नेते चव्हाण यांनी सांगितले. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा करून लोकसभा अध्यक्ष ठरवला गेला तर निश्चित त्यांना पाठिंबा दिला जाईल. ही लोकशाहीची परंपरा आहे. परंतू रेटून जर काही चालवायचा प्रयत्न झाला तर आम्हालाही आमचा उमेदवार उभा करावा लागेल. दिल्लीत सभागृहाच्या समन्वयाचं काम करताहेत त्यांनी हे नियोजन केले पाहिजे, असे चव्हाणांनी यांनी स्पष्ट केले.

Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला टोकाला जायला लावू नका", विशाल पाटील अन् कदमांना इशारा
बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात जी घटना घडली त्याबद्दल निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला का? पराभूत उमेदवाराला एफआयआर दिला पाहिजे. मुंबई उत्तर पश्चिमबाबत जो काही गोंधळ आहे त्यावर स्पष्टीकरण द्यावे ही मागणी आमची आहे. निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे यासाठी बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी आमची मागणी आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले आहे.