Sangli Samachar

The Janshakti News

ज्येष्ठ शिक्षक आता होणार केंद्रप्रमुख; पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता यादी केली जाणार तयार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जून २०२४
राज्यातील शाळांच्या केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे. त्यावरून राज्यातील सेवा ज्येष्ठ शिक्षक लवकरच केंद्रप्रमुख होणार आहेत. या पदोन्नती कार्यवाहीबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.


मागील काही वर्षांपासून केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीने सरळ सेवेने भरण्याचा तिढा निर्माण झाला होता. जलदगतीने केंद्रप्रमुख पदावर पदोन्नत्या दिल्या जात नसल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी शासन निर्णयानुसार तरतूद आहे.

यासाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेली नियुक्ती विचारात घेणे आवश्यक आहे. मात्र, याअनुषंगाने जिल्हा परिषदस्तरावर कार्यवाही होत नसल्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची दखल घेण्यात आली असून, शासनाच्या तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. दरम्यान, कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.