yuva MAharashtra उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वाशी बंड; सैनिक उपाशी काँग्रेसी तुपाशी !

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्वाशी बंड; सैनिक उपाशी काँग्रेसी तुपाशी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ जून २०२४
नुकतीच देशाच्या राजधानीमध्ये एनडीएची बैठक झाली. त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतर अनेक घटक पक्षासोबत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्याने स्टेज शेअर केले. ही घटना पाहून महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या अनेक व्यक्ती यांच्या मनात ही जागा उद्धव ठाकरे यांची होती ती त्यांनी गमावली याबाबत विचार आले असतील. खुद्द उद्धव ठाकरे यांना व त्यांच्या परिवाराला या क्षणाला काय वाटले असेल का...? हे ही यात फार महत्वाचे आहे. 

शिंदेंच्या बंडाला ठाकरे यांनी कोर्टात आव्हान दिले व जे काही सुप्रीम कोर्ट, जनता याबद्दल ही लढाई लढून त्यात यश मिळाले नसताना लोकांना पोचवायचे ते पोचवले. शिवसेना कुणाची ही बाब सद्या तरी न्यायप्रविष्ट असून अडीच वर्षाच्या काळात शिंदे यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या हक्काची सत्ता, शिवसेना पक्षाचे नाव, निशाणी सर्व काही हिसकावून नेले आहे. साहजिकच ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या सर्व सैनिकांना याबद्दल कमालीचा राग असणे साहजिक आहे. आता ठाकरे यांची मिळालेली निशाणी जनमानसात गेली असल्याने कदाचित त्यांना नाव निशानीची गरजही नसेल पण त्यांना गेलेला मतदार मात्र परत मिळवायचा आहे. त्यासाठी त्यांना अजून अनेक वर्ष संघर्ष करतच रहावा लागेल. 

उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षी धोरणामुळे त्यांच्या संघटनेचे दोन पार्ट झाले. शिवसेना पक्ष व निशाणी उद्धव ठाकरे यांच्याकडून निघून गेली. त्यानी देखील निशाणी निघून जाऊन भाजप सोबतचे नाते संपुष्टात आल्यावर काँग्रेस धार्जिणे धोरण स्वीकारून काँग्रेसच्या मतदाराला आकृष्ट करण्याचे धोरण राबवले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेतून हिंदुत्व, सावरकर, देशभक्तीचे मुखपत्रातील आक्रमक लेख, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे टायटल सर्व गायब झाले. काँगेस सोबत असणारा पारंपारिक अल्पसंख्याक मतदार, हिंदुत्वाच्या विरूध्द काम करणारा व सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या मतदारासोबत ठाकरे यांनी स्वतःची संघटनात्मक मोट बांधली. जे बाळासाहेबांच्या स्वप्नातही कधी आले नव्हते. 


नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल आले व त्यातून उद्धव ठाकरे अस जरी म्हणत असले की त्यांना समाधानकारक यश मिळाले आहे पण लोकसभेला त्यांच्या पारंपरिक मतदाराने मतदान केले नाही ही बाब त्यांच्या पक्ष वाढीसाठी घातक असून जर जागांच्या वादात भविष्यात महाविकास आघाडी राहिली नाही तर त्यांचा सध्याचा नवमतदार जो वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादी ला ठोकून मतदान करत आलेला आहे. तो उद्धव ठाकरे यांना सोडून निघून जाउ शकतो याची जाणीव त्यांना नक्की झालेली आहे. व हा मतदार ठाकरेंनी आकृष्ट केला तर काँग्रेस साठी देखील चिंतेचे ठरू शकते. 

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला व त्यांना मानणाऱ्या वर्गाला शिंदे यांना सुरुंग लावणे शक्य झाले नसले तरी जे सैनिक ठाकरे यांच्याबरोबर उरले आहेत त्यांच्या एकट्याच्या जोरावर विधानसभा जिंकणे कठीण आहे. त्यासाठी ठाकरे यांना त्यांचा काँग्रेसी मतदार सोबत लागेल. जर आघाडी झाली नाही तर हा मतदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील का? हा सवाल जाणकार व्यक्तींना आहे. 

राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे बिगुल वाजवायची तयारी सर्व पक्षांनी केलेली आहे. कोणती सिट ए कॅटेगरी मध्ये आहे व कोणती मागे पडली आहे याबाबत पडताळणी करायला साहजिकच सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असेल. जे पराभूत झालेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराने रिकाम्या जागा भरायचे प्रयोग आरंभ केलेले असतील यामध्ये मवीआ वर उद्धव ठाकरे विसंबून राहिले असतील तर ती त्यांच्यासाठी धोक्याची सूचना आहे कारण ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे आव्हान आहे तसेच आता काँग्रेसला उद्धव ठाकरेंचे आव्हान तयार झाले आहे. 

काँगेस हा ब्रिटिश सरकारच्या काळात बनलेला व देशाची वर्षानुवर्ष सत्ता उपभोगलेला पक्ष आहे जो २०१४ पासून राज्यात व देशात सत्तेत नव्हता. त्या पक्षाला पुनर्जीवन देण्याचे काम उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणारा आपला मतदार हा आपल्या सोबत स्वतंत्र लढल्यावर राहील का? याचा प्रयोग काँग्रेस ने सांगली मधून करून पाहिला व तो यशस्वी झाला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाविकास आघाडी मध्ये राहून फक्त ५.२% मतदान झालेलं आहे. तर काँग्रेस च्या अपक्ष उमेदवाराला ४८.९% मतदान झालेलं आहे. व भाजपला ४०.४ % मतदान झालेलं आहे. म्हणजेच जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र लढला तर त्यांची सांगली सारखी स्थिती राज्यभरात होईल. असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. मराठवाडा व विदर्भात ठाकरे यांचे संघटन आहे. कोकणातही आहे पण त्या ठिकाणचा स्कोअर चांगला राहिलेला नाही. उत्तर महाराष्ट्र व मुंबई यांच्या भरवसा ठेवून ठाकरे यांची संघटना सत्तेत येणे कठीण आहे.सांगलीच्या या प्रयोगात ठाकरे यांच्याविरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी होती का? याचे संशोधन ठाकरे यांनी करणे गरजेचे आहे. जर या दोन्ही पक्षांनी ठाकरे ना दगा दिला तर ठाकरेंचे राज्यात भूतो न भविष्यती नुकसान होणार आहे. 

मागील लोकसभा भाजपच्या सोबत लढून उद्धव ठाकरे यांच्या १८ जागा आलेल्या होत्या आता त्या ९ झाल्यात. ७ जागा शिंदेंना मिळाल्या व ठाकरे यांच्या मदतीवर मिळालेल्या मतदानाच्या जोरावर राज्यात काँगेसच्या १३ व राष्ट्रवादीच्या ८ जागा आल्यात. उद्धव ठाकरे यांच्या पदरात काय आल? त्यांना भाजपच्या जागा कमी केल्याचे समाधान मिळाले असले तरी इंडी आघाडीची सत्ता देशात येण्यापासून रोखण्यास भाजपप्रणीत एन डी ए ला यश आलेले आहे. भाजप व उद्धव ठाकरे यांच्या भांडणाचा फायदा हा शरद पवार व काँगेस यांनी उचलला. त्यांची मात्र भाजप सोबतची युती कायमची तुटली. 

शरद पवार त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणतात आम्हाला ठाकरे याना भाजपच्या जवळ जाऊ द्यायचे नव्हते. उद्धव ठाकरेंचा चेहरा सेक्युलर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करून त्यांचा मतदार पदरात पाडायचे सुख काँग्रेस राष्ट्रवादीने घेतले आहे पण स्वतःचा मतदार काँग्रेस सोबत आहे हे त्यांनी सांगलीत दाखवून दिले. तसच सुषमा अंधारे यांच्यासारख्या वक्त्या ठाकरे यांच्याकडे पाठवून उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्ववादी मतदार हा कायमचा भाजपकडे वळवण्यात आलेला आहे. यामुळे युती आघाडी शिवाय लढायचे झाल्यास ठाकरे एकाकी पडू शकतील अशीच राज्यातली स्थिती आहे. त्यावेळी मनसे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत यायची नाही अशी त्यांची आडमुठी राजकीय भूमिका राहिलेली आहे. 

आता भाजप सोबत आजन्म युती नाही अस म्हणून त्यांनी हिंदुत्व प्रेमी मतदाराला जाहीर सांगून टाकले आहे व ही बातमी सुषमा अंधारे त्यांच्या सोशल मीडिया वरून शेअर करत आहेत म्हणजे त्या ठाकरे यांना भाजप पासून अजून दूर घेऊन जात नाहीत का? व हे काम त्यांना कोणी दिले आहे? हे शिवसैनिकांना कळू नये यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडायचे होते की भाजप सोबत फारकत घेण्याची त्यांची पूर्वीपासून मानसिकता तयार होती हे या भूमिकेतून समजून येते. जेव्हा भाजप सोबत जाणार अशा वावड्या पत्रकारांनी उठवल्या तेव्हा अल्पसंख्याक मतदार नाराज होऊ नये म्हणून ठाकरेंना हे स्पष्टीकरण देणे भाग पडले यातच त्यांची काँग्रेसी मतदारांवर अवलंबून राहण्याची नामुष्की दिसून येते.

देशभरात इंडी आघाडी झाल्याने भाजपने देखील अगदी जनसेना, मनसे, अपना दल वगैरे इतर अनेक छोट्या पक्षांना एन डी ए मध्ये एकत्र घेतले आगदी बेरजेचे गणित गरजेचे आहे म्हणून त्यांनी अजित पवार यांना सत्तेत गरज नसताना वाटा दिला पण मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपण नाराज नाही ते बाळासाहेबांचे पुत्र आहेत वगैरे वक्तव्य निवडणुकीत करताना ठाकरे यांनी मोदींच्या वक्तव्याचा जाहीर गैरअर्थ लोकांत जाऊन सांगितला. ही भूमिका त्यांना कितपत तारेल हे येणारा काळ ठरवेल. 

या लोकसभेच्या मतदानात मतदारांनी सर्वच पक्षांना आपले अस्तित्व दाखवून दिले आहे व त्याचा फटका भाजपला देखील बसलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर टिकवली ती युती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या नावाने तोडली. उद्धव ठाकरे यांनी काँगेस सोबतचा मतदार आपलासा करायचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाला जणू काँग्रेस बनवलं. बाळासाहेबांच्या पाठीशी असणाऱ्या सर्व सैनिकांना त्यांनी राग निर्माण करून भूमिका बदलण्याच्या मनस्थितीत सहज आणून ठेवलं. पण सैनिक व मतदार यात एक भेद असतो हे ते विसरले. सैनिकांच्या पुढच्या पिढ्या जर शिंदेसोबत गेल्या तर त्यांना त्याचे नुकसान होणार आहे. बाळासाहेबांच्या काँग्रेस सोबत जाण्याच्या व अल्पसंख्यांकांना जवळ घेण्याच्या मर्यादांचे उल्लघन उद्धव ठाकरे यांनी जरी केलेलं असल व त्यांना त्यांचे अस्तित्व दाखवून काही जागा निवडून आणण्यात समाधान जरी मिळाले असले तरी एकनाथ शिंदे व भाजपकडे त्यांचा हिंदुत्ववादी मतदार वळला आहे याचे मोठे शल्य व काँग्रेसी मतदार त्यांना सोडून जाऊ शकतो याची धाकधूक त्यांच्या मनात नक्की असणार आहे. प्रत्येक वेळेला वेळ, काँगेस, अल्पसंख्याक मतदार व सैनिक साथ देतील का? याचा पेच आता पुढील काळात ठाकरे यांच्यासमोर असेल. त्यावेळी आपले हिंदुत्व बरे होते. अस त्यांना म्हणायला लागले तर वेळ निघून गेलेली असेल. 

हिंदुत्ववादी मतदारांना फाटा देऊन उद्धव ठाकरे यांनी काँगेस राष्ट्रवादीचा राज्यात फायदा करून दिला. त्यांना अनेक पत्रकार व आंदोलक यांची मोलाची साथ मिळाली. याचा फायदा त्यांना ९ जागा जिंकण्यात झाला असला तरी जो मतदार त्यांना मतदान करतो आहे तो त्यांचा नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काही पत्रकार मुद्दाम त्यांना भूमिका ताठर ठेवण्याचा सल्ला देत असले तरी उद्धव ठाकरे यांचा पक्ष केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडलेला आहे. केंद्रात ज्यांची सत्ता असते त्यांचीच सत्ता राज्यात येत असते असे जनरल गणित मानले जाते. उद्धव ठाकरे यांच्या मतावर राज्यभरात काँगेस राष्ट्रवादी गेल्या ५ वर्षात तुपाशी राहिली. आता उद्धव यांचे सैनिक मात्र केंद्राच्या सत्तेतून बाहेर ठेवले गेले आहेत.