| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २ जून २०२४
शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोकं आहेत. उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करत असतात. हमाल, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम कामगार, कचरा वेचक याठिकाणी माणसं प्रामुख्याने काम करतात. त्यांना रोज काम नसतं, पगार ठरलेला नसतो, कामाची वेळ ठरलेली नसते, कामाची शाश्वती नसते, अशा कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कामावरून काढून टाकलं तरी दाद मागता येत नाही. कामगार वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्यामुळे संघटन नाही. संघटित नसल्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येत नाही. संघटितपणे प्रश्न सुटू शकतात. संघटितपणे मालकावर दबाव आणू शकतात. म्हणून वेगवेगळ्या स्थरातील कामगारांना न्याय, अधिकार, हक्क, मिळावा यासाठी असंघटित कामगारांना संघटित करण्याचं काम डॉ. बाबा आढाव यांनी केलं आणि 1953 साली तेल आणि गुळ बाजारातल्या 500 हमालासह हमाल पंचायतीची स्थापना केली.
पुण्यातील भवानी पेठेत मार्केट यार्ड येथे मोठ्या प्रमाणात हमाल दिसत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी असते तिथेच कामगारांच्या हक्कासाठी संघर्षाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातून बहुतांश हमाल/कामगार पुण्यात स्थायिक झाले आहे. हमाल पाठीवरून धान्याची ओझी, सिमेंटची पोती ने-आण करत असतात. दिवसभर कष्टाचं काम करत असताना त्यांच्या मुखात कधी दोन घास जातात, कधी नाही. गावाकडून उदरनिर्वाहासाठी आलेल्या कामगारांना राहण्यासाठी घर नव्हते. घर भाड्याने घेणे परवडत नसल्याने कामगार बाजारात रस्त्याच्या कडेला आपलं घर करतात. काम करताना हमालांचे खूप हाल होत होते. तसेच मालकाकडून त्यांचे शोषण ही होत असल्याने त्यांना हक्क आणि अधिकाराची जाणीव कशी होणार? कामगार, हमालांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हमाल पंचायत संघटनेची स्थापना करण्यात अली.
हमाल पंचायतीच्या स्थापनेनंतर प्रत्येक कामगाराला काम मिळू लागले, कामाचा योग्य तो मोबदला त्यांना मिळू लागला. तसेच विविध सेवा सुविधा मिळू लागल्या. कामगारांच्या हक्कासाठी, कामगारांच्या प्रतिष्ठेसाठी,कामगारांच्या कामाच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा घडवून आणता येईल. शिवाय अशा प्रयत्नांना कायदेशीर पाठिंबा असला पाहिजे. अशी भूमिका अगदी सुरुवातीपासूनच हमाल पंचायतीने घेतली होती. हमाल पंचायत संघटना आता तर राज्यभर विस्तारली आहे. पुण्यात सध्या सुरुवातीपेक्षा संघटनेत-3700 पेक्षा अधिक सभासद कार्यरत आहेत. या संघटनेमुळे पुण्यातील कष्टकरी हमालांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात बदल घडून आलेत. या संघटनेच्या प्रयत्नामुळे हमालांना एक पाठींबा मिळाला आहे.
1948 च्या कायद्यानुसार हमालाची सुरक्षितता किमान वेतन, दिवसाला 8 तास काम, आठवड्यातून 1 दिवस सुट्टी, पगारी रजा, आजारपणासाठी रजा, वार्षिक बोनस, भविष्य निर्वाह निधी (PF), निवृत्तिवेतन इत्यादी अशा साऱ्या सुविधा मिळत असून ही फारच कमी जणांना त्याचा लाभ मिळतोय. 1948 च्या दुकान आणि आस्थापन कायद्यानुसार व्यापाराकडे कामाला असलेल्यांच्या यादीत हमालांची नावे असणे आवश्यक नव्हते. त्यामुळे ते विविध लाभासाठी पात्र नव्हते. जर त्यांना वेतन कमी मिळाला तरी अधिक काम करावं लागत अथवा त्यांच्यावर काही अन्याय झाला तरी ते कायदेशीर रित्या दाद मागू शकत नव्हते.
1956 सालचा पहिला संप
19 नोव्हेंबर 1956 रोजी पुण्यातल्या गूळ व्यापाऱ्यांनी हमाली दरात वाढ नाकारली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात त्या वेळी पहिला संप पुकारला तो संप यशस्वी झाला. त्यावेळी हमालांच्या लक्षात आलं की संघटन किती महत्वाचं आहे. हमाल पंचायतीने असंघटित हमालांचे आणि माथाडी कामगारांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी एक कायदा आणण्याचं ठरवलं. तोच कायदा म्हणजे माथाडी कायदा. या कायद्यासाठी अधिक संघर्षाने 1969 रोजी हा कायदा पारित झाला. या कायद्याअंतर्गत हमालांची नियमित रोजगारावर असलेले कामगार अशी दखल घेतली गेली आणि नोंदणी झालेल्या कामगारांचे बहुतांश आणि लाभ त्यांना मिळू लागला. हा इतिहासातला असंघटित कामगारांचा लढा हमाल पंचायत संघटनेने जिंकला होता. 1980 सालापासून माथाडी कायद्यांतर्गत हमाल सुरक्षित आहेत..
100 किलो वजनाचे पोते आले 50 किलोंवर…
हमालांचे अतोनात काबाड कष्ट आणि अधिक त्रासदायक काम असतं. त्यांना कधी सिमेंटची पोती तर कधी धान्याची पोती भरावी लागतात. 100 किलो पेक्षाही जादा वजनाचे ओझे बऱ्याचदा त्यांना पाठीवरून ने-आण करावे लागते. या कामामुळे त्यांना आरोग्याच्या ही भरपूर समस्यांना सामोरे जावे लागत होते. पाठीचा खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र त्यांना पर्याय नव्हता तात्पुरत्या गोळ्या औषधे घेऊन पुन्हा कामावर ते जात होते. कामातून मिळालेला त्यांचा बराच पैसा औषधासाठी जात होता. या परिस्थितीमुळे हमाल पंचायतीला 100 किलो वजनाचे असणारे पोते निम्म्यावर म्हणजे 50 किलो इतके कमी करण्यात यश आले. त्यामुळे कामगारांना थोडा आधार आणि थोड्याफार प्रमाणात पैसा देखील शिल्लक राहू लागला. या आधारामुळे कामगाराला जिंदगी सुधारण्याचे एक उत्तेजन मिळाले. पण, हमाल पंचायत एवढ्यावरच थांबलं नाही तर कष्टकऱ्या कामगारांना, हमालांना मोजक्या दरात सकस आहार मिळावे यासाठी पंचायतीने कष्टाची भाकर केंद्र सुरु केले. ना नफा ना तोटा या तत्त्वांवर आधारित कष्टाची भाकर केंद्र चालतं. महिलांना आणि काही कामगाराना देखील कष्टाची भाकर केंद्रात काम मिळाल्याने त्यांचा रोजंदारीचा प्रश्न मिटला. या स्थापन केलेल्या कष्टाची भाकर केंद्रात गरजुंना, कामगारांना पोळी-भाजी झुणका-भाकर आठवड्यातून एकदा गोड पदार्थ अगदी मोजक्या दरात रुपये 30 रुपयांमध्ये परवडणारे असे पौष्टिक जेवण मिळतं.
हमाल पंचायत एक मार्गदर्शक केंद्र आहे. त्यामध्ये हमाल पंचायतीचे काम चालतं. हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव हे न चुकता नियमितपणे 10 वाजता हमाल पंचायतीच्या ऑफिस मध्ये येतात. ऑफिसमध्ये पहिल्यासारखीच गर्दी असते बाबा लोकांच्या सर्व प्रश्नांना शंकांना उत्तरे देतात. आणि त्यांच्या कामात लक्ष घालण्याची हमी देतात. हमाल पंचायतीची आजही तेवढ्याच ताकतीने आणि कुठल्याही शासकीय अर्थसाह्याशिवाय उभी आहे. हा उपक्रम कामगारांच्या संघटनेतून विकसित झालेला आहे. एक गाव एक पानवठा, हमाल माथाडी कायदा, पथारी व्यावसायिकांसाठीचे धोरण, रिक्षा पंचायतीद्वारे रिक्षाचालकांचे प्रश्न अशा अनेक चळवळी करून बाबांनी त्या-त्या सर्वाना न्याय मिळवून दिला आहे. असंघटितांना पेन्शन मिळावी, यासाठी अनेक आंदोलने उभी केली. त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.
कष्टाची भाकर…
2 ऑक्टोबर 1974 रोजी डॉ. बाबा आढावांनी पुण्यात पहिलं 'कष्टाची भाकर' केंद्र सुरू केलं. समाजक्रांतीचा विचार जोरावर असण्याचा तो जमाना. तेव्हा संघठीत कामगार चळवळी प्रभावी होत्या. पण बाबांनी असंघठीत बांधवांची संघटना बांधली. कामगार चळवळीतील आर्थिक मागण्यांची चौकट ओलांडून कष्टकरी-कामकरी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या विविध क्षेत्रांना बाबांच्या हमाल पंचायतीने स्पर्श केला. त्यामुळेच कष्टाची भाकर हे केवळ 'शिव वडा-पाव सेंटर' नव्हतं. बाबा म्हणतात, "हा महात्मा गांधींना अपेक्षित असलेल्या क्रांतीचा प्रयोग होता. क्रांती ही नेहमीच अन्यायाविरोधातील संघर्षातून घडत नाही. तर राबणारांना जाचणाऱ्या प्रश्नांबद्दल आस्था ठेवणाऱ्या उपक्रमांतूनही ती धीम्यागतीने मुळ धरते." त्या काळात मार्केट यार्डातील किंवा रेल्वे स्टेशनवरील हमालांच्या कष्टाचं नियमन नव्हतं. हमाल पंचायतीने एका मजुराने कितपत ओझं उचलणं मानवीय आहे याची निर्देशकं तयार केली. हमालीचे दर निश्चित केले. पण कष्टाचं काम करणारांना परवडेल असा आहारही हवा. त्यासाठी कष्टाची भाकर हे हमाल पंचायतीनंच उभारलेलं केंद्र सुरू केलं. भूक हा कष्टकऱ्यांचा मुलभूत प्रश्न. त्यावरचा हा तोडगा होता.
आजही पुण्यासारख्या शहरांमध्ये देशभरातून मजुर वर्ग येतो. यांना कुठेतरी स्वस्तात भाड्याने खोली मिळते. मजुर अड्ड्यांवर काम मिळतं. पण कष्टांच्या तुलनेत मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण सहसा व्यस्तच असतं. अनेकांना आपलं सर्व उत्पन्न केवळ पोट भरण्यासाठी खर्चावं लागतं. बचत होतच नाही. त्यामुळे पोषक व स्वस्त आहार कष्टाची भाकर मधून मिळू लागला. या आहाराची चव व बाज कष्टकऱ्यांना आवडेल असा हवा. त्यासाठी कष्टकऱ्यांच्या कुटुंबियांनाच या केंद्रात अन्न शिजवण्याची जबाबदारी दिली गेली. त्यामुळे हा आहार लोकप्रिय झाला. अगदी शिक्षणासाठी पुण्यात राहणारे गरीब विद्यार्थीही 'कष्टाची भाकर'मधून जेवू लागले. भवानी पेठेत सुरू झालेल्या पहिल्या केंद्राचा विस्तार होत होत आज पुण्यात 11 केंद्र कार्यरत आहेत. केंद्रांमधून भाकरी – 10 रू., चपाती- 5 रू. भाजी 10 रू., भजी – 10 रू., पिठलं – 5 रू. इतक्या स्वस्त दरात आजही मिळतं. शिवाय 100 ग्रॅम जिलेबीही 10 रूपयात मिळते. कष्टाची भाकरमधील जेवण चवदार, पोषक व स्वस्त असतं. या केंद्रातून दर दिवशी किमान दहा हजार लोक आपली भुक भागवत होते.
विशेष म्हणजे कष्टाची भाकरमधील कामगारांचा या उपक्रमात विशेष विचार केला गेलाय. या उपक्रमात 51 लोक कार्यरत आहेत. भवानी पेठेतील मुख्य केंद्रातून अन्य केंद्रांना रोज टेंपोतून ताजे खाद्यपदार्थ पोचवले जातात. सकाळी आठ वाजताच हे जेवण सर्व केंद्रांवर पोचलेलं असतं. कारण मजुर वर्गाला कामावर जाण्याआधीच जेवण मिळायला हवं. त्यासाठी केंद्रांचे कामगार सकाळी सहालाच हजर असतात. त्यांची ही कर्तव्यदक्षता टिकून रहावी यासाठी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी, दिवाळी बोनस, पगारी सुट्ट्या आदी सुविधा दिल्या जातात. दिलीप मानकर कष्टाच्या भाकर केंद्रांचं व्यवस्थापन पाहतात.
हमाल नगर, हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय
हमाल पंचायतीने हमालांच्या घरासाठी सुद्धा योजना अमलात आणली. हमाल काही झोपडपट्टी तर कधी रस्त्यावर राहतात. हमाल पंचायतीच्या प्रयत्नामुळे मार्केट यार्ड जवळ 5 एकर जमिनीवर हमालनगर उभा केलं. हमालनगरमध्ये जवळपास 420 घरे आहेत. हमालांच्या मुलांचा ही प्रश्नध होताच. आई-वडील दोघेही कामावर असल्यामुळे मुलांचे भविष्य अंधारातचं होतं. मुलांनी शिक्षण घ्यावं, स्वतःचा विकास करावा या उद्देशाने हमाल पंचायतीने हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय स्वखर्चानं उभं केलं.सध्या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत.शाळेत वह्या, शैक्षणिक साहित्य मोफत दिले जातात. शाळेत कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. आंबेडकरनगर, आनंदनगर, काकडेवस्ती या भागातील विद्यार्थी आहेत. शाळेत अकरा शिक्षक आणि 5 कर्मचारी आहेत.
स्वखर्चाने बांधलेलं हमाल भवन
हमालांनी एकत्र येऊन स्वखर्चाने हमाल भवन बांधलं. सर्व हमालांनी वर्गणी गोळा केली. प्रत्येक हमालांनी 201 रुपये वर्गणी दिली आहे. हमाल भवन बांधताना कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही. हमाल भवन हे तीन मजली आहे. हमाल भवनमध्येच हमाल पंचायतीचं ऑफिस आहे.विविध कार्यक्रमांना हमाल भवन भाड्याने दिलं जातं. हमाल पंचायतीच्या सभासदाच्या घरातील लग्न समारंभाला 20 हजार भाडे आकारले जाते. सभासद नसणाऱ्यांना 25 हजार भाडे आकारले जाते. हमाल भवनामध्ये हमालांच्या मिटींग होतात. हमाल भवनातून जास्त उत्पन्न मिळत नाही. हमाल भवनाची स्वछता, लाईट बिल, पाणी याचा खर्च हमालांच्या वर्गणीतून केलं जातं.