| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जून २०२४
''मतमोजणीवेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षकांसह तब्बल सहाशे पोलिस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कालावधीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल,'' असा इशारा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, मतदारांनी दिलेला कौल मतपेटीतून समोर येईल. त्यानंतर मिरवणूक काढण्यास सक्त मनाई असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. घुगे म्हणाले, ''निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अनेकांवर कारवाईही करण्यात आली. यासह जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यात कोठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. सद्य:स्थितीत मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या शासकीय गोदाम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता मतमोजणीसाठीही पोलिस यंत्रणा सज्ज आहे. पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोठेही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. निकालानंतर सूचनेनुसार मिरवणूक काढण्यास मनाई आहे.''
...असा असेल बंदोबस्त
अप्पर पोलिस अधीक्षक १
पोलिस उपाधीक्षक ३
पोलिस निरीक्षक १३
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६८
अंमलदार ४७८
वाहतूक पोलिस ३९