Sangli Samachar

The Janshakti News

राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका; 3 हजार रुपयांचा ठोठावला दंड !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जून २०२४
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुक्रवारी विशेष सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला. कोरोना काळात वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 20 पदाधिका-यांविरुद्ध खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीला नार्वेकरांनी दांडी मारली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

भाजपने 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊन दरम्यान बेस्टच्या वीज दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी बेस्ट महाव्यवस्थापकांना कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपच्या एकूण 20 पदाधिकार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुरु आहे. सध्या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली जात आहे. खटला अंतिम टप्प्यात आलेला असताना शुक्रवारी सुनावणीला राहुल नार्वेकर गैरहजर राहिले. त्यावर संतप्त होत न्यायाधीशांनी नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि दंडाची रक्कम न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश दिले. तसेच 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचेही सक्त निर्देश दिले.


कोर्टाचे निरीक्षण 

आमदार-खासदारांविरोधातील खटले जलदगतीने चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना केलेली आहे. किंबहुना, उच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा आखून दिली आहे. त्यामुळे सर्व आरोपींनी प्रत्येक सुनावणीला हजर राहणे आवश्यक आहे. असे असताना आरोपींनी गैरहजर राहून खटल्याला दिरंगाई करणे योग्य नाही, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवले.