yuva MAharashtra ठाकरे गटाची 288 जागी विधानसभा लढवण्याची तयारी !

ठाकरे गटाची 288 जागी विधानसभा लढवण्याची तयारी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ज्या मतदारसंघात सेनेला आघाडी मिळाली आहे त्यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मित्रपक्षांच्या जागांचाही अहवाल अभ्यासला जाणार आहे. त्यामुळेच राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या संपर्कप्रमुखांकडून मागवला आहे.

लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू झाल्याचं दिसून येतंय. लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल याचा अहवाल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संपर्कप्रमुखांकडे मागितल्याची माहिती आहे. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसंच संभाव्य विजयाचे समीकरण कसं असेल याबाबत ठाकरेंनी अहवाल मागितला असल्याची माहिती आहे.

त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही याबाबतचा अहवाल उद्धव ठाकरेंकडून मागवण्यात आला आहे.


कसा बनवणार संपर्कप्रमुख अहवाल ?

1. लोकसभा निवडणूक 2024 चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल.

2. यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?

3. शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?

4. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?

5. सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?

6. संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?

7. फक्त शिवसेना लढली तर काय होईल?

8. मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?

9. बिएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.

10. लोकसभा निवडणूक 2024 आपला अभिप्राय थोडक्यात?

राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या तर सांगलीची जागा अपक्ष असलेल्या विशाल पाटलांनी जिंकली. त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागल्याचं दिसून आलं. त्यामध्ये भाजपला 9 जागा जिंकता आल्या. तर शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागी यश आलं.